हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. अखिल भारतीय मराठी नाट्य महामंडळाच्या वतीने पार पडलेल्या मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आणि प्रशांत दामलेंचे रंगकर्मी पॅनल विजयी ठरले. यानंतर आता मराठी नाट्यपरिषद अध्यक्ष पदी कोण असेल..? याबाबत चर्चा रंगली असताना अखेर या पदासाठी प्रशांत दामले यांची निवड झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी नवनाथ कांबळी यांचा पराभव केला आहे.
अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड होताच त्यांनी पहिली प्रतिक्रिया देत म्हटले कि, ‘मी जेव्हा अध्यक्ष झालो नव्हतो तेव्हाही मी नाट्यगृहांच्या अवस्थेबाबत महापालिकांना भेट देत होतो. मी माझ्या परिने विनंती करत होतो. आता मंत्री उदय सामंत हे आमचे ट्रस्टी आहेत. तसंच शरद पवार हे देखील आमचे ट्रस्टी आहेत. ते आम्हाला चांगल्या कामात मदत करतील याचा मला विश्वास वाटतो. तसंच निवडणुकीपुरतेच जे काही मतभेद होते ते आमच्यात तुम्हाला दिसले. आता ते संपले आहेत. गटतट काही नाही. आम्ही साठजण एकत्र मिळून काम करणार आहोत’.
कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी सुमन गढेकर तर खजिनदारपदी सतीश दोडके यांची निवड झाली आहे. तसेच इंदुलकर समीर, पोळके दिलीप, ढगे सुनील यांची निवड कार्यकारिणीवर झाली आहे. कार्यकारिणीमध्ये तेरा पैकी अकरा सदस्य निवडून आले आहेत. त्यात संजय देसाई, मालपेकर सविता, रेगे दीपक, सुशांत शेलार, शिंगाडे विशाल, विजय साळुंके, चौगुले विजय, महाजन गिरीष, संजय राहते, क्षिरसागर दीपा, पाटील संदीप यासह इतर सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली आहे.
Discussion about this post