हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मल्याळम सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी. बालचंद्रन यांचे वयाच्या ६२व्या वर्षी निधन झाले. ते दीर्घकाळापासून आजारी होते. सोमवारी पहाटे त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. बालाचंद्रन हे केवळ अभिनेता नसून एक उत्तम पटकथा लेखक देखील होते. अंकल बन, पुलिस, कल्लू कोनडोरू पेन्नू या चित्रपटासाठी त्यांनीच कथानक लिहिले होते. या चित्रपटांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली असून आजही हे चित्रपट लोकप्रिय आहेत. यावर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या सुपरस्टार वन चित्रपटात बालचंद्रन शेवटचे झळकले.
https://www.instagram.com/p/CNRXbZWpNIs/?utm_source=ig_web_copy_link
अभिनय व पटकथा लेखनाव्यतिरिक्त दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांनी काम केले आहे. २०१२ मध्ये त्यांनी कवी पी.कुनिरामन नायर यांच्या जीवनावर आधारित इवान मेघरूपन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मात्र, या चित्रपटानंतर त्यांनी कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही. बालचंद्रन हे एक उत्तम नाटककारही होते. त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांसाठी पटकथा लिहिल्या. त्यांच्या पावम उस्मान या नाटकाची प्रचंड चर्चा झाली होती. या नाटकाचा प्रेक्षक वर्ग फार मोठा होता. तसेच या नाटकासाठी त्यांना १९८९ मध्ये केरळ साहित्य अकादमी पुरस्कार आणि केरळ व्यावसायिक नाटक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बालचंद्रन यांच्या मागे पत्नी श्रीलता आणि मुलगा श्रीकांत तर मुलगी पार्वती आहेत. त्यांच्या निधनाने मल्याळम सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेता आणि निर्माता जयसूर्याने आपल्या सोशल मीडियावर बालचंद्रन यांचे फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
Discussion about this post