हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या गोड गळ्याने गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांना राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार आशाताई भोसले यांना प्रदान करण्यात आला. शुक्रवारी २४ मार्च २०२३ रोजी, सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम अत्यंत दिमाखात पार पडला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आशा भोसले यांची गाणी अजरामर असून आजही त्यांची गाणी मनाला स्पर्शून जातात. आशा भोसले यांचा जन्म १९३३ साली झाला आणि संगीत विश्वाला एक चमचमता तारा मिळाला. आशा भोसले यांची कारकीर्द १९४३ साली सुरू झाली आणि त्यानंतर १९४८ सालामध्ये त्यांनी बॉलिवूड सिनेमा विश्वात पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये तब्बल ७ दशकं त्यांनी अधिराज्य गाजवले. आजतागायत आशा भोसले यांनी हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून गाणे गायले आहे. तसेच आशाताईंनी २० पेक्षा अधिक भाषांमध्ये विविध जॉनरची गाणी गायली आहेत. विविध भाषांमधील हजारो गाणी गाण्यामुळे आशा ताईंचे २०११ साली ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवण्यात आले आहे.
आशाताईंच्या या सुरेल कारकिर्दीचा सन्मान ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात ‘आवाज चांदण्यांचे’ या सुरेल मैफिलीचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीत रंग भरण्यासाठी सुप्रसिद्ध गायकांची हजेरी होती. यामध्ये सुरेश भोसले, साधना सरगम, ऋषिकेश कामेरकर, आर्या आंबेकर, बेला शेंडे, मधुरा दातार या सुमधुर आवाजांचा समावेश होता. या गायकांनी संपूर्ण मैफिलीत आशाताईंची सदाबहार गीते सादर करीत सर्वांचे मन जिंकले. तसेच या कार्यक्रमाचे निवेदन सूत्र अभिनेते सुमित राघवन यांनी जबाबदारीने पार पाडले.
Discussion about this post