हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या अनेक दिग्गज नावांमध्ये रंगकर्मी मोहनदास श्रीपद सुखटणकर यांचे नाव आदराने घेतले जाते. एकेकाळी पडदा उघडला कि टाळ्यांचा कडकडाट आणणारे ‘नटसम्राट’ अशी यांची ख्याती. आज मराठी रंगभूमीने तिचा एक हिरा गमावला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाल्याची अतिशय दुःखद बातमी मिळते आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी सुखटणकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने नाट्य सृष्टीत शोकाकुल वातावरण झाले आहे.
मराठी रंगभूमीवरील ‘नटसम्राट’ मोहनदास सुखटणकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ आजारानं ते त्रस्त होते आणि या दरम्यान त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील आपल्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. आज रंगभूमी देखील धाय मोकलून आसवं गाळत असेल. रंगभूमीला एक विशेष प्रतिभा देणाऱ्या दिग्गजांपैकी एक सुखटणकर होते. त्यांची कैक नाटके गाजली आहेत. आजही त्यांपैकी काही नाटकांचा अनेक सोहळ्यात विशेष उल्लेख केला जातो. मुख्य म्हणजे सुखटणकर यांनी ऐतिहासिक नाटक ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मध्ये साकारलेली भूमिका ही विशेष आणि प्रचंड गाजली होती. याशिवाय त्यांची ‘लेकुरे उदंड झाली’, ‘स्पर्श’, ‘दुर्गी’ हि नाटके मोठ्या प्रमाणावर चर्चेत राहिली.
इतकेच नव्हे तर ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’ या मराठी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ज्या प्रेक्षकांना भावल्या होत्या. सुखटणकर यांनी नाट्य क्षेत्राची ५०हून अधिक वर्षे सेवा केली आहे. यासाठी मुंबईच्या ’आम्ही गोवेंकर’ या प्रतिष्ठित संस्थेकडून त्यांना २०१३ साली ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. मोहनदास सुखटकर हे कुसुमाग्रजांच्या साहित्यावर स्वगत आणि काव्यवाचनाचा कार्यक्रम करीत असे. हा कार्यक्रम करताना त्यांना अनेक ठिकाणी स्टॅंडिंग ओव्हेशन मिळायचे. अशा कलाकाराने आज मनोरंजन सृष्टीचा निरोप घ्यावा हे कला सृष्टीचे नुकसानच म्हणावे लागेल.
Discussion about this post