हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात नवरात्रीचा उत्सव सुरु असून आज अष्टमीचा दिवस आहे. नवरात्रीतील महत्वपूर्ण दिवसांपैकी एक दिवस म्हणून अष्टमी मानली जाते. शांतता आणि सात्विकता याचे उत्तम उदाहरण म्हणजे शुभ्रवर्ण, चतुर्भुज, वीणा – पुस्तक – कमंडलु धारिणी देवी सरस्वती. आज अभिनेत्री अपूर्व नेमळेकर हिने नवरात्रीनिमित्त केलेल्या खास फोटोशूटदरम्यान सरस्वतीचे देवीचे स्वरूप धारण केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो इतके सुंदर आहेत कि अगदी देवीचा भास होईल. या शक्ती उत्सवाचे निमित्त साधून तिने चाहत्यांना आईच्या मूळ आणि विविध स्वरूपाचे दर्शन देण्याचा निर्धार केला आहे. तिने केलेल्या या फोटोशूटच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या शक्तिपीठांची रूपे देखील उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटला चांगली पसंती दिली आहे.
आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे आणि आजच्या दिवशी अपूर्वाने माता सरस्वतीचे सौम्य स्वरूप धारण केले आहे. भारतीय संस्कृतीतील एक श्रेष्ठ देवता. प्राचीन वाङ्मयातून वाक्, वाणी, वाग्देवता, वागीश्वरी, शारदा, भारती, वीणापाणी, ब्रह्मी, भाषा, गीर, वर्णमाला, विशाला, मेघा, कुटीला इ. भिन्न नावांनी तिचा उल्लेख आढळतो. सरस्वती या शब्दाची व्युत्पत्ती सृ- वाहणे, हलणे या धातूपासून झाली असून त्याचा अर्थ ‘गतिमती’ आहे. आध्यात्मिक अर्थाने ती निष्क्रिय ब्रह्माचे सक्रिय रूप असून तिला ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिवर्गांना गती देणारी शक्ती म्हटले आहे. माता सरस्वती शुभ्रवर्ण, शुभ्रवस्त्रधारिणी, अलंकार-विभूषित, चुतुर्भुज, पुंडरिक, माला, वीणा व कमंडलू धारण करणारी आहे. पुस्तक व वीणा ही तिची प्रमुख आयुधे असून मूर्तिशिल्पांतून कमळ, हंस, मोर, सिंह, मेंढा हे वाहन/आसन असल्याचे दिसते. क्वचित तिचे वाहन नंदीही दर्शवितात. मात्र हंस आणि मोर ही लांछने (वाहने) तिची लाडकी आहेत.
हा फोटो शेअर करताना अपूर्वाने कॅप्शनमध्ये लिहिले कि, नवरात्रीचा आठवा दिवस! रंग – गुलाबी. देवी- सरस्वती. सरस्वती देवी, ही ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची देवी आहे ; ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी वा श्रीपंचमी म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो.. मी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
याआधी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अपूर्वाने कोल्हापूर, करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीचे स्वरूप धारण केले होते तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिने मुंबापुरीची ग्रामदेवता मुंबादेवीचे स्वरूप धारण केले होते. तिसऱ्या दिवशी कर्नाटक उडपी येथील दुर्गा परमेश्वरीचे मनमोहक रूप तर चौथ्या दिवशी राशीनची यमाई माता स्वरूप धारण केलेले फोटोशूट तिने शेअर केले आहे. यानंतर पुढे पाचव्या दिवशी बंगाली देवी आणि सहाव्या दिवशी कार्ल्याच्या एकविरा आईचे नयनरम्य स्वरूप, पुढे सातव्या दिवशी चंद्रपूरची आराध्य देवता महाकालीचे अद्भुत स्वरूप धारण केलेले फोटोशूट अपूर्वाने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत असून अनेकांनी तिच्या फोटोंमधून देवी आईचे दर्शन घडल्याचे म्हणत तिचे व तिच्या टीमचे कौतुक केले आहे.
Discussion about this post