हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी स्टुडिओ निर्मित आणि अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असल्यामुळे इतर कलाकार कोण असतील.? याबाबत आणखीच उत्कंठा वाढली आहे. यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तासांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले गेले. ज्यामध्ये आणखी एका भूमिकेतील मराठी अभिनेत्याचा चेहरा समोर आला आहे. हि भूमिका आहे निष्ठावान बाजीप्रभू देशपांडे यांची आणि या भूमिकेत अभिनेता शरद केळकर आपल्या भेटीस येत आहे. हे मोशन पोस्टर पाहताच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.
मुळात ‘हर हर महादेव’ ही केवळ गर्जना कधी नव्हतीच. तर शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणा-या मावळ्यांचा तो महामंत्र होता. समोरचा गनिम कितीही शक्तिशाली असला तरी त्याला सळो की पळो करुन सोडण्याची उर्जा निर्माण करीत मावळ्यांना नवी उमेद देणारी हि शिवगर्जना आहे. याच गर्जनेचा जाप करीत बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्दी जौहरच्या सैन्याविरुद्ध घोडखिंड लढवली होती. या दरम्यान त्यांनी आपल्या प्राणाची आहूती देत खिंड मात्र पावन केली. याच निष्ठावान बाजीप्रभूंच्या लढवय्या करारी बाण्याची गाथा ‘हर हर महादेव’च्या माध्यामातून भव्य पडद्यावर पाहता येणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या या मोशन पोस्टरमध्ये आणि त्यातील संवादात ऐकू येते कि, ‘जोवर तोफा ऐकू येणार नाहीत तोवर आई विंझाईची आण आहे मला, एकही गनीम ही खिंड पार करु शकणार नाही… हा शब्द आहे बाजीचा.’ हे संवाद अभिनेता शरद केळकरच्या दमदार आवाजात ऐकताना अंगावर काटा उभा राहिला नाही तर नवलंच!
या आव्हानात्मक भूमिकेबद्दल बोलताना अभिनेता शरद केळकर म्हणाले की, ‘आपण लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांच्या, गनिमी काव्याच्या, त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याच्या अनेक प्रेरणादायी कथा वाचत आलेलो आहे. बाजीप्रभुंच्या पावनखिंडीची वीरगाथा ही त्यापैकी एकच. बाजीप्रभू या व्यक्तिमत्वाबद्दल जेव्हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे छत्रपती शिवराय आणि स्वराज्याप्रती त्यांची असलेली कमालीची निष्ठा आणि प्रेम. घोडखिंडीमध्ये त्यांनी केलेला पराक्रम हा आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणादायी असाच आहे. अशा बाजीप्रभुंची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो. ही गोष्ट तेवढ्याच प्रखरपणे आणि सच्चेपणाने प्रेक्षकांसमोर येण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि संपूर्ण टीमने अत्यंत मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांना ही गोष्ट नक्कीच भावेल याबाबत माझ्या मनात शंका नाही.’
झी स्टुडिओज निर्मित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. शिवाय हा चित्रपट केवळ मराठीतच नाही तर हिंदी, तामिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड अशा ५ भाषांमधून एकाच दिवशी संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट तमाम भारतीयांसाठी दिवाळीची विशेष भेट ठरणार आहे.
Discussion about this post