हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी शुक्रवारी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट महाराष्ट्राच्या मातीतील लोककलावंत शाहीर साबळे म्हणजेच कृष्णराव गणपतराव साबळे यांचा जीवनपट आहे. मराठी मनाला बळ देणाऱ्या शाहिरांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी झळकला.
तर शाहिरांची पत्नी भानुमती साबळे हि भूमिका केदार शिंदे यांच्या लेकीने वठवली. चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. याशिवाय अनेक राजकीय मंडळींनी देखील चित्रपट पाहिला आणि आपली प्रतिक्रिया दिली. यामध्ये राजकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व शरद पवार यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टीमचे भरभरून कौतुक केले आहे.
सध्या विविध सेलेब्रिटी, कलाकार आणि प्रेक्षक- समिक्षक या चित्रपटा विषयी भरभरून बोलत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिला आणि आवर्जून आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार सपत्नीक ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पहायला मुंबई पेडर रोड येथील ‘एनएफडीसी’ या चित्रपटगृहात आले होते.
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने शरद पवारांचे जोरदार स्वागत केले. चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार म्हणाले कि, ‘प्रख्यात शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. शाहीरांच्या गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहीला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संगीताच्या माध्यमातून घराघरात पोहचविण्याचे महान कार्य शाहीर साबळे यांनी केले. चित्रपट पाहताना त्या कालखंडाची पुन्हा आठवण झाली, याचे अत्यंत समाधान वाटले. शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो.. मला फक्त शाहीर साबळे दिसले’.
सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट सर्वत्र चांगलाच गाजतो आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षक चांगली पसंती देत आहेत. या चित्रपटात दिग्गज कलाकावंतांची फौज आणि त्यासह मातीतल्या कलाकारांचे दर्शन घडत आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण घटना, ठिकाणे, माणसं या चित्रपटात दर्शवण्यात आली आहेत. अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्मिती सावंत, शुभांगी सदावर्ते, अतुल काळे, अश्विनी महांगडे, मृण्मयी देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे. शिवाय अजय- अतुल यांचं संगीत थिएटर गाजवण्यासाठी चित्रपटाची उजवी बाजू ठरत आहेत.
Discussion about this post