हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण जगाची झोप उडवणारं एक प्रकरण समोर आलं. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण… आफताब पूनावाला नामक तरुणाकडून आधी फसवणूक आणि मग अत्यंत निर्घृणपणे आपल्या प्रियसीची हत्या असे हे प्रकरण आहे. ज्याचा सर्व स्तरांवरून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर सर्व सामान्यांतूनही संताप व्यक्त केला जात आहे. अशातच मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीही आपले मत, आपली प्रतिक्रिया दिली आहे.
श्रद्धा मूळ वसईची… तिचा प्रियकर आफताब पूनावालासोबत ती नायगाव येथे राहत होती. यानंतर ते दिल्लीमध्ये स्थायिक झाले. दिल्लीत गेल्यावर तिने लग्नाचा हट्ट केला. हा हट्ट वादाचे कारण ठरला आणि शेवट तिचा मृत्यू. एका भांडणादरम्यान आफताबने तिचा गळा आवळला आणि तिला मारून टाकलं. आता आपण अडकणार या भीतीने त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून १८ दिवस फ्रीजमध्ये ठेवले. दरम्यान तो इतर मुलींना डेट करत होता. पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतल्यानंतर हे प्रकरण समोर आले. याविषयी अभिनेते शरद पोंक्षे यांनी पोस्ट शेअर करत इतर मुलींना जागरूक होण्याचे आवाहन केले आहे.
फेसबूकवर एका यूझरची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. ज्यात लिहिलंय, ‘कधी येणार अक्कल..? प्रेमाची व्याख्या बदलत चाललीय, मुंबईची श्रध्दा मदन, आफताब पूनावालाच्या प्रेमात बुडून, घरदार आईवडील सोडून लिव्ह इन मध्ये राहायला गेली आणि लग्नासाठी मागे लागते म्हणून आफताब ने तिला मारून, तिचे 35 तुकडे करून, ते 300 लिटर च्या नवीन फ्रीज मध्ये साठवून, पुढचे 18 दिवस रोज एक एक तुकडा जवळपासच्याच जंगलात नेऊन टाकला, ह्या विचाराने की प्राण्यांनी खाल्ल्यावर कुणाला जे झालंय ते कळणार नाही. आई वडिलांनी खूप सांगून सुध्दा न ऐकल्याचा इतका भयंकर परिणाम असू शकतो हे श्रध्दा ला कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत कळलं ही नसेल..,’ अशा आशयाची ही पोस्ट आहे. या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त करणाऱ्या कमेंट केल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष या गुन्हेगाराला काय शिक्षा होईल याकडे आहे. संपूर्ण जनमानसांत त्याच्याविषयी घृणा व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post