हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची धमाल आता कुठे वाढली होती. सगळे जीव तोडून खेळत होते. आता सगळ्यांनाच जिंकायचं आहे हे त्यांच्या खेळात दिसत होतं. गेल्या काही काळापासून घरातील सर्व स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मन जिंकले होते मात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती ती तेजस्विनी लोणारी. प्रेक्षकांनी जवळपास तिला विजेती म्हणून घोषित केले होते. अशातच टास्कदरम्यान तिच्या हाताला झालेल्या दुखापतीमूळे तिला बिग बॉसचा खेळ इथेच सोडून मेडिकल एक्झिट घ्यावी लागली आहे. ज्याचा सगळ्यांनाचं धक्का लागला आहे.
पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांच्या साथीने अनेक धक्के पचवताना दिसले. गेल्या आठवड्यात समृद्धी जाधवच्या एव्हिक्शननंतर घरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. मात्र यानंतर आता घरातील प्रत्येक स्पर्धकाला रडू कोसळलं ते तेजस्विनी लोणारीच्या एक्झिटमूळे. तिचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. तेजस्विनीच्या हाताला एका टास्कदरम्यान अतिशय गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे तिला खेळातून बाहेर पडायचं की ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं..? असा निर्णय घेण्याचा सल्ला बिग बॉसने दिला होता. मात्र तिची दुखापत पाहता डॉक्टरांनी तिला विशेष काळजी आणि उपचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. म्हणून बिग बॉसने तिला खेळ सोडावे लागेल हे सांगितले.
कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, तेजस्विनी लोणारी कन्फेशन रूममध्ये दिसते आहे. तेजस्विनीची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर बिग बॉसने तिला कन्फेशन रूममध्ये बोलावून निर्णय दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेजस्विनीच्या हाताची दुखापत गंभीर असल्यामुळे तिला यापुढील खेळ खेळणे सोयीचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे अखेर तेजस्विनीची इच्छा नसतानाही तिला बिग बॉसच्या घरातून स्पर्धकांचा आणि बिग बॉसचा निरोप घ्यावा लागला आहे. येत्या भागात तेजस्विनी घरातून बाहेर पडणार असून तिला निरोप देताना घरातील प्रत्येक सदस्य भावुक होऊन धाय मोकलून रडताना दिसणार आहे. यावेळी किरण माने, अपूर्वा, अमृता धोंगडे यांना अश्रू अनावर झाले. तर रहिवासी नेम प्लेट लावण्यावरून तेजस्विनी- राखीमध्ये वाद झाला होता. पण जेव्हा तेजस्विनीने तिच्या नावाची पाटी काढली तेव्हा राखी म्हणाली ‘हि जागा तुझी आहे’
Discussion about this post