हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता श्रेयस तळपदे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या नव्या कोऱ्या मालिकेमुळे छोट्या पडद्यावर दिसणार आहे. जवळजवळ १७ वर्षांनी तो छोट्या पडद्यावर परतणार आहे, त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून रसिक त्याच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या दरम्यान तो मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. गतवर्षापासून कोरोनाचा कहर पाहता त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात चित्रीकरण करण्यावर सरकारने बंदी घातली होती. दरम्यान नाट्यगृह बंद असल्यामुळे नाटकाचा एकही प्रयोग झाला नाही. मात्र कोरोना काळात श्रेयस तळपदेने सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याशिवाय त्याच्यावर व्यावसायिक नाटकाची प्रॉपर्टी बेकायदेशीररित्या कमर्शिअलरित्या वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लोकप्रिय नाटक ‘अलबत्या खलबत्या’चा सेट श्रेयसला कमर्शिअल शूटिंगसाठी सुरेश सांवत यांनी दिला होता. कोरोनाच्या नियमावलीनुसार, नाटकं बंद असल्यामुळे अलबत्या खलबत्या’चा सेट ओस पडून होता. त्यामुळे श्रेयस तळपदेच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या भक्षक प्रोजेक्टसाठी या नाटकाचा सेट वापरण्यात आला. मुळात या नाटकाचा सेट वापरण्यासाठी अव्दैत थिएटर नाट्यसंस्थेचे निर्माते राहुल भंडारे यांची परवानगी घेणे निश्चितच गरजेचे होते. परंतु निर्माते राहुल भंडारे यांना सुरेश सावंत यांनी चुकीची माहिती दिली आणि हा सेट गोडाऊन मधून काढून श्रेयस तळपदेला वापरासाठी देण्यात आला.
दरम्यान या सर्व प्रकाराविषयी निर्माते राहुल भंडारे यांना कोणत्याही प्रकारची कल्पना सुरेश सावंत वा अन्य कुणीही दिली नाही. त्यामुळे आता हे प्रकरण श्रेयसच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. मुळात बेकायदेशीरित्या आणि सरकारच्या नियमांचे उल्लंघन करीत या नाटकाचा सेट कमर्शिअल कारणासाठी वापरण्यात आल्याने (Intellectual Property Rights) बौद्धिक मालमत्ता अधिकाराअंतर्गत श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी राहुल भंडारे यांच्याकडून शिवडी पोलिस स्थानकात अर्ज देण्यात आला आहे. त्यामुळे श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाईदेखील केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Discussion about this post