हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेमा विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अनेकदा विविध पेहरावातील लुक तसेच विविध व्हिडिओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती देण्यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करतो. सिद्धार्थ जाधवने शेअर केलेल्या पोस्ट या सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या सिद्धू लंडनमध्ये आहे आणि यावेळी त्याने लंडनमधील ‘त्या’ खास ठिकाणाला भेट दिली आहे. हे खास ठिकाण म्हणजे महामानवाचं घर.
अभिनेता सिद्धार्थ जाधव यांने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर लंडनमधील या ठिकाणाचे काही फोटो शेअर केले आहेत. कोणताही भारतीय हा लंडनमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आवर्जून भेट देताना दिसतो. हे ठिकाण म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर. ज्या घरात बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ घालवला ही तीच वास्तू आहे. या वास्तूत आजही बाबासाहेबांच्या विचारांचे अस्तित्व जिवंत आहे. त्यामुळे या वस्तूला भेट देताक्षणी सिद्धूही भारावून गेला होता.
सिद्धार्थ जाधवने लंडनमध्ये गेल्यानंतर आवर्जून या वास्तूला भेट दिली आणि काही फोटो क्लिक केले. हेच फोटो त्याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. या वास्तूला भेट देणे हा क्षण सिद्धूसाठी अत्यंत खास होता. सिद्धार्थने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असताना सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर.. माझा भिमराया’. सोशल मीडियावर सिद्धूचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देताना ‘जय भीम’ अशी कमेंट करताना दिसत आहेत.
Discussion about this post