हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक वर्षांपासून सिने सृष्टीत कार्यरत असणारी अभिनेत्री स्मिता तांबे हि तिच्या विविध भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. आजतागायत तिने आपल्या कारकिर्दीत अनेक सिनेमा गाजवले आहेत. काही चित्रपटांमध्ये मुख्य तर काही चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारत तिने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. शिवाय नेहमीच नवनवीन भूमिकांसाठी सतत आग्रही असणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी अभिनेत्री स्मिता तांबे हि एक अभिनेत्री मानली जाते. यानंतर आता आगामी मराठी चित्रपट ‘लगन’मध्ये स्मिता आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.
जी. बी. एंटरटेन्मेंट निर्मित आणि अर्जुन गुजर दिग्दर्शित ‘लगन’ हा आगामी मराठी चित्रपट येत्या ६ मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. स्मिता साकारत असलेल्या भूमिकेचे नाव ‘राधा’ असे आहे. राधा हि अतिशय लहानग्या खेडयात राहणारी ऊस तोडणी कामगार आहे. त्यामुळे स्मितासाठी राधाची भूमिका साकारणे खरोखरीच एक आव्हान ठरले.
करारी, कणखर मात्र तरीही स्वभावाने सोज्वळ असणारी हि व्यक्तिरेखा स्मिताने अव्वलरित्या पेलली आहे. यामध्ये स्मिताचा खेडवळ लूक अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. तर माहितीनुसार, या व्यक्तिरेखेसाठी स्मिताने स्वत: बैलगाडी चालवली आहे. याशिवाय ऊसाच्या भल्यामोठया मोळया डोक्यावर घेत उन्हातान्हात तिने शूटिंग केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध गावांमध्ये करण्यात आले आहे.
आपल्या राधा या भूमिकेविषयी बोलताना अभिनेत्री स्मिता तांबे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान स्मिता म्हणाली की, ‘हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंददायी आणि तेवढंच आव्हानात्मक होतं. मुळात प्रत्येक स्त्रीमध्ये खूप माया दडलेली असते. आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची प्रत्येक आईची धडपड असते.
हे पात्र साकारताना, प्रत्येक आईची ती तळमळ दाखवणं, एवढंच मी या माझ्या भूमिकेतून केलं आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने गावातील जीवनपद्धती पुन्हा एकदा जवळून बघता आली याचा ही आनंद आहे’. ‘लगन’ चित्रपटाचे लेखन- दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केले आहे. तर छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांनी केले आहे.
Discussion about this post