हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा परिस्थितीत आता मराठी कलाकार या रुग्णांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने नुकतेच रक्तदान केले आहे. सोबतच तिने इतरांनाही रक्दान करण्याचे आवाहन केले आहे. रक्तदान करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत तिने एक पोस्ट देखील लिहिली आहे. ज्यात तिने बाबांच्या शिकवणीचा उल्लेख केला आहे.
या पोस्टमध्ये तेजस्विनीने लिहिले, ‘अभिमानाने आरशात बघता आलं पाहिजे…- असं माझे बाबा म्हणायचे. झाकल्या मूठीने मदत केली की लोक म्हणणार तुम्ही काहीच करत नाही…केलेली मदत दाखवली की म्हणणार पब्लिसिटी साठी केली…. जमेल तशी केली की म्हणणार एवढीशी का केली ? पण ‘तेवढीशी ‘ का होईना केली ना, किमान हातावर हात धरून तर नाही बसलो….! समाजकल्याण करताना कॅमेरा घरी ठेवायचा. – ( ही पण माझ्या बाबांची शिकवण ) पण आजच्या डिजिटल युगात जाहीर करावं लगतं. कारण कलाकार कॅमेराच्या मागेही अभिनयच करत असतो असं बहुतेकांना वाटतं… पण तसं नाही आहे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्याची जाण मला एक कलाकार म्हणून आहे, कारण मुळात कलाकार हा संवेदनशीलच असतो…
समाजातील एकाला जरी माझ्या ह्या कृतीतून प्रेरणा मिळाली तरी माणूस म्हणून काहीतरी करू शकले याचं समाधान असेल. आपण चांगलं कर्म करत रहायचा…त्याची नोंद बाकी कुठे नाही, तरी ‘तिथे वर’ होत असते. तेंव्हा,मला जमेल तसं, जमेल तेंव्हा झाकल्या मूठीने ( जसं गेले अनेक वर्ष करत आले ) आणि आता जमेल तेंव्हा जाहीर करून मदत करत राहीन. कारण मी आजही ‘स्वतःला अभिमानाने आरशात बघते.’मला ह्या नाजूक काळात ही मदत करू दिल्याबद्दल माझा मित्र आणि टाटा मेमोरियल ह्यांचे मनःपूर्वक आभार !
Discussion about this post