हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची आज्जी सुशीला कुलकर्णी यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने निधन झाले. आज्जींच्या निधनानंतर कुलकर्णी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नेहमी हसणारी सोनाली आज्जीच्या जाण्याने मात्र कोलमडली होती. यानंतर आता कुठे हे कुटुंब सावरत आहे. तोच यंदाचा गणेशोत्सव आला. गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे कसं वातावरणात आनंद निर्माण करणारं असतं. तसेच गणेशोत्सव साजरा करता येणार नाही याचं दुःखही फार मोठं असतं. आज्जीच्या निधनामुळे यंदा सोनालीच्या माहेरी बाप्पाचं आगमन झालेलं नाही. पण तिने चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि सोबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर आपल्या संपूर्ण कुटुंबासह फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि, ‘तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..! इतक्या वर्षांत आम्ही यंदा पहिल्यादंच गणपती बसवत नाहीयोत.. आजी म्हणाली होती, मी गणपती येईस्तोवर थांबते, पण…… निदान त्या शारीरिक वेदनांतून तिची सुटका झाली. ती जिथे कुठे असेल शांत, समाधानी, आनंदी असेल असं वाटतेंय. माझी लाडकी आजी आता माझ्या लाडक्या बाप्पा कडेच गेलीये. प्रिय आजी (आई), पुढच्या वर्षी, तू शिकवलंयस तसा, नेहमीप्रमाणे, तुझ्या मनासारखा गणेशोत्सव साजरा करू.’
सोनाली कुलकर्णीने आपल्या आजीच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. तेव्हा तिने आज्जीसोबत घालवलेल्या सर्व क्षणांना एकत्र करून एक व्हिडीओ शेअर केला होता. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते कि, ‘आज्जी.. ..तू आमच्यात असशील…. आम्ही असे पर्यंत..’. सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अलीकडेच तिचा ‘पांडू’ आणि त्यानंतर ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट चांगलेच गाजले. यातील पांडू चित्रपटात साकारलेल्या उषा पात्रासाठी तिला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान देखील मिळाला आहे. तर ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्लॅनेट मराठी ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post