हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज्जी म्हणजे काय…? असा एक सामान्य प्रश्न विचारला तर लहान मुलं अगदी सहज सांगतात कि, आजी म्हणजे वडिलांची किंवा आईची आई. आजी म्हणजे माया.. आजी म्हणजे उन्हात छाया.. आजी म्हणजे पडलेल्या दाताची बाई.. आजीला भेटायची आम्हाला नेहमीच घाई. कारण आजी असतेच अशी कि जिथे मायेला काही अंत नसतो. मऊ दूध भात फक्त आजीच्या हातूनच भारी लागतो. अशी आजी कधीतरी अचानक आपल्याला सोडून जाते आणि मन अगदी पिळवटून जातं. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या बाबतीत असच झालं आहे. तिच्या आजीचं निधन झालं असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आजीला श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आजीच्या आठवणींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोनालीच्या आजीचे नाव सुशीला कुलकर्णी असे आहे. त्यांच्या निधनानंतर कुलकर्णी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. यात काही फोटो आहेत. तर सोनालीच्या लग्नावेळचे देखील काही व्हिडीओ आहेत. सोनालीचा आजीवर आणि आज्जीचा सोनालीवर खूप जीव होता हे या व्हिडिओतून दिसत आहे. थकलेली आजी नातीच्या लग्नात मात्र किती आनंदी आणि उत्साही दिसत होती हे या व्हिडिओत दिसत. अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करत एक काळजाला हात घालणारं कॅप्शन लिहिलं आहे. यात तिने लिहिलंय कि, ‘आज्जी… तू आमच्यात असशील.. आम्ही असे पर्यंत..
सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडीओ पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. जो तो सोनालीच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. तर एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, तुझ्यात त्या दिसतात. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे कि, मला माझी आज्जी आठवली. आज्जी असतेच अशी कि ती कुणाचीही असली तरीही आपली वाटते. आजीच्या मायेचा पदर फार मोठा असते. या पदरात ती सारी लेकरं मायेनं मोठी करते. त्यामुळे आज्जी हि फक्त व्यक्ती नाही तर ती एक भावना आहे. जी आयुष्यभर सोबत जपून ठेवावी वाटते.
Discussion about this post