हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड गायक सोनू निगमला चेंबूर मधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान जी धक्काबुक्की करण्यात आली ती उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्पेकर याने केली आहे, असा आरोप गायकाने तक्रारीत केला आहे. या प्रकरणाचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याप्रकरणी अधिक माहिती देताना डीसीपी हेमराज राजपूत यांनी म्हटले की, गायक सोनू निगमच्या तक्रारीनुसार स्वप्नील फातर्पेकरच्या विरोधात कलम ३४१, ३३७, ३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकाराविषयी मीडियासोबत बोलताना गायक सोनू निगम याने सांगितले आहे कि, ‘धक्काबुक्की झाली बाकी काही नाही. मी आता संबंधितांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आपण काय करतो, कसे वागतो, गर्दीच्या ठिकाणी काय काळजी घ्यायला हवी यासाठी मी त्या व्यक्तीविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे. तुम्हाला जबरदस्तीनं सेल्फी हवा असतो. तो कसा काय शक्य आहे..? बर तो फोटो दिला नाही तर तुम्ही दादागिरी पण करता असं कसं चालेल..?’ आपला संताप व्यक्त करत अत्यंत महत्वाचा प्रश्न गायक सोनू निगम याने यावेळी उपस्थित केला आहे.
यावेळी सोनू निगमने सांगितले कि, ‘मला सेल्फीसाठी विचारणा करण्यात आली. मी नाही म्हटल्यावर समोरच्यानं मला पकडले. ज्यानं पकडले तो आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्पेकर होता. त्यानंतर मला वाचविण्यासाठी माझ्या मदतीसाठी माझे सहकारी हरिप्रसाद मध्ये आले. तर त्याने हरि यांना धक्का दिला. त्यानंतर त्यानं मलाही धक्का दिला. पुढे मला वाचविण्यासाठी रब्बानी मध्ये पडले. तर त्यांनाही धक्का देण्यात आला. यावेळी ते ज्या पद्धतीने पडले ते गंभीर जखमी झाले आहेत. जर इथे काही सळ्या वगैरे असत्या तर कदाचित त्यांचा मृत्यू झाला असता. केवळ सेल्फीसाठी नकार दिला या रागातून त्याने हि धक्काबुक्की केली. पण याचा परिमाण फार गंभीर होऊ शकला असता.
Discussion about this post