हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | लॉकडाउन सुरू झाल्यापासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने स्थलांतरीत मजुरांसाठी आत्तापर्यंत खूप मदत केली आहे. घरी पायी जाणाऱ्या मजुरांचं दुःख पाहून सोनूने हजारो लोकांना त्यांच्या घरी सुखरुप सोडलं आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊनही सोनू अनेक गरजूंची मदत करत आहे. नुकताच सोशल मीडियावर मिळालेल्या एका मेसेजनंतर सोनूने पटणातील बेघर कुटुंबाला घर बनवून देण्याचा निर्णय घेतला.
एका सोशल मीडिया यूझरने सोनूला पटणातील एक फोटो शेअर करत म्हटले की, ‘सर, या महिलेच्या पतीचं निधन झालंय. घर मालकानेही त्यांना घराबाहेर काढलंय. एक महिन्यापासून ही महिला रस्त्यावर राहत आहे आणि तिची दोन लहान मुलं भुकेने व्याकूळ आहेत. कृपया मदत करा. सरकारकडून तर काही अपेक्षा नाही.’ यानंतर सोनूने या ट्वीटला उत्तर देताना लिहिले की, ‘उद्या या कुटुंबाच्या डोक्यावर हक्काचं छत असेल. या लहान मुलांसाठी एक घर नक्की होईल.’ सोनूच्या या ट्वीटचं लोक भरभरून कौतुक करत आहेत.
सोनूने लॉकडाउनमध्ये केरळवरून काही स्थलांतरीत मजूरांना एअरलिफ्ट केलं होतं. याच मजुरांपैकी उडीसा येथील राहणाऱ्या एकाने त्याच्या दुकानाचं नाव सोनू सूदच्या नावावर ठेवलं आहे. ‘सोनू सूद वेल्डिंग वर्कशॉप’ असं त्याने दुकानाचं नाव ठेवलं. सध्या या दुकानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.