हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २० मार्च असून आजचा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणून भारतात साजरा केला जातो. आज महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला होता. हा सत्याग्रह २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांनादेखील समान हक्काने घेता यावे म्हणून करण्यात आला होता. तर आजच्या या सत्याग्रहाची आठवण करून देत मराठी अभिनेते किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता किरण माने यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी महाड येथील चवदार तळे या परिसरातील फोटो शेअर केले आहेत. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळासोबतचा फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘…चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ, अशातला भाग नाही… आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो, तर तुम्ही आम्ही काय मेलो नव्हतो. त्यामुळे चवदार तळ्यावर केवळ पाणी पिण्यासाठी जायचे नसून, इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील माणसे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी ! …चवदार तळे, महाड !’.
किरण माने यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेले शब्द हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत, चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना हे उद्गार आंबेडकरांनी काढले होते आणि समाजाला एक मार्ग दाखवण्याचे कार्य केले होते. किरण माने यांनी त्याच दिवसाची आणि या सत्याग्रहाची आठवण करून देणारी हि पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे कि, ‘हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर #20 मार्च चवदार तळे सत्याग्रह दिन’. तसेच आणखी एकाने लिहिलंय, ‘तहानलेल्या पाखरांवर तू कसे उपकार केलेस, एकच ओंजळ प्यायलास पण सारे तळे चवदार केलेस’.
Discussion about this post