हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुप्रतीक्षित मराठी सिनेमा “वेल डन बेबी” या चित्रपटाचा खास प्रीमिअर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओने या चित्रपटाचा प्रीमिअर ९ एप्रिल २०२१ रोजी करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतातील प्राईम सदस्यांना या सिनेमाचे स्ट्रीमिंग ९ तारखेपासून करता येईल.
या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. प्रियांका तंवर यांचे दिग्दर्शन असणार आहे. तर आनंद पंडित, मोहन नादार आणि पुष्कर जोग यांची निर्मिती असणार आहे. हा चित्रपट व्हिडीओ पॅलेसतर्फे सादर होणार आहे. हा चित्रपट कौटुंबिक असून विविध भावभावनांचे मिश्रण असणारा आहे. त्यामुळे सहकुटुंब ह्या चित्रपटाची मजा घेता येईल. तसेच ह्या चित्रपटाची कथा आपलीशी वाटेल हे नक्की.
अमेझॉन प्राईम व्हिडिओवर सादर होणाऱ्या या चित्रपटाबद्दल अमेझॉन प्राईम व्हिडीओ इंडिया कन्टेन्ट विभागाचे संचालक आणि प्रमुख विजय सुब्रमण्यम म्हणाले कि,” “गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर आमच्या ग्राहकांना दुसरा मराठी डायरेक्ट-टू-स्ट्रीमिंग सिनेमा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. वेल डन बेबी ही एक साधी मात्र गुंतवून ठेवणारी कथा आहे. संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणून त्यांस मनोरंजन पुरवणे आणि कुटुंबाला प्राधान्य देणारा कन्टेन्ट पुरवण्यातील हा एक नवा मौल्यवान प्रयत्न आहे. भाषेपलीकडे जात विविध कथांमधून आमच्या प्रेक्षकांना सेवा देण्याच्या आमच्या उद्देशाला या नव्या सिनेमातून सुयोग्य बळकटी लाभणार आहे.”
मुख्य म्हणजे या मनोरंजक चित्रपटाच्या माध्यमातून प्रियांका तंवर यांनी दिग्दर्शकीय क्षेत्रात नुकतेच पदार्पण केले आहे. त्यामुळे चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाबाबत त्या अतिशय उत्सुक आहेत. हा चित्रपट कौटुंबिक जिव्हाळा हाताळणारा असल्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Discussion about this post