गोष्ट आपल्याला माहिती असलेलीच, दोन विरोधी डान्स ग्रुप, यावेळी बॉलीवूडमधल्या साजेशा पेट्रीयॉटिक वातावरणामुळे, इंडिया आणि पाकिस्तान. त्यांच्यात कायम खडाजंगी. भेटतील तिथे डान्स फाईट. त्यात जबरदस्तीचा सबप्लॉट आहे लंडनमधल्या बेकायदेशीर एशियन इमिग्रंट्सचा. त्यांना आपल्या देशात परत जायचय पण पुरेसे पैसे नाहीयेत. मग त्यासाठी एक मोठं बक्षिस असलेल्या झीरो ग्राउंड नावाच्या स्पर्धेत हे दोन डान्स ग्रुप एकत्र येतात आणि सगळ्यांची फेव्हरेट असलेल्या ब्रिटिश डान्स ग्रुपला अपेक्षेप्रमाणे हरवतात. टिपिकल बॉलीवूड अंडरडॉग स्टोरी.
दिग्दर्शन केलंय कोरिओग्राफर रेमो डीसोझाने. त्याची गोष्टीवर पकड दिसत नाही. बऱ्याचदा गोष्ट फास्ट होते मध्येच स्लो होते. एका इमोशन मधून दुसऱ्यात जायला तो आपल्याला वेळ देत नाही. त्यामुळे आपण त्यातून बाहेर पडतो. एक एक लेव्हल डान्स स्पर्धा जिंकताना, सगळ्यात महत्त्वाची असलेली प्रॅक्टिसला कुठेच महत्व दिलेलं दिसत नाही, सर्व डान्स ग्रुप्सना एकसमान संधी आणि वेळ न देता फक्त भावनेवर अशा स्पर्धा जिंकता आल्या असत्या तर मग कशाला रेमो सर.
कला ही काहीतरी व्यक्त करण्यासाठी असते हे पुन्हा पुन्हा आपले फिल्म मेकर्स विसरताना मी बघतो. डान्सफिल्म मध्ये डान्सच असणार यात वाद नाही, पण त्या वेगवेगळ्या डान्सला जोडणारी गोष्ट पण असावी अशी निदान आशा असते, पहिल्या ABCD मध्ये ती दिसली होती, नंतर त्यात स्टार्स घुसले आणि गोष्ट गायब झाली, असो
सगळंच निगेटिव्ह नाहीये फिल्म मध्ये, चांगलं असं, की डान्सच्या बाबतीत म्हटलं तर कोरिओग्राफी विलोभनीय आहे यात शंका नाही, रेमोने त्यात कमाल केलीय. वेगवेगळे टॅलेंटेड डान्सर्स, विलक्षण कॉश्यूम्स, खूप सारे लाईट्स, कलर, बॅकग्राऊंड मधेही नाचणारे डान्सर्स यामुळे खूप नयनसुखदायी. पण यात अडचण अशी आहे की हे तुकड्या तुकड्यात बसवलेले डान्स आहेत, खास करून कॅमेरासाठी डीझाईन करण्यात आलेले. तुम्हाला ते तसे बाहेर करता येणार नाहीत.
सगळ्यात मोठी कमतरता जाणवते ती, चांगल्या गाण्यांची. मुकाबला , बेजुबान, इल्लेगल वेपण, मिले सूर मेरा तुम्हारा ही सगळी गाणी रिमेक आहेत, आणि दरवेळी प्रमाणे या वेळीसुद्धा गणपतीचं एक गाणं (जे अजिबात गरजेच न्हवतं) ओरिजिनल एकही गाणं या चित्रपटात नाही, याहून वाईट गोष्ट काय असू शकते एखाद्या डान्स फिल्म साठी.
प्रभू देवाने त्याच्या वयाच्या मानाने ही स्पर्धा जिंकले स्पर्धेच्या मानाने नाही. मुलींमध्ये नोरा फतेही भाव खाऊन जाते, मेन कास्ट असलेले वरून आणि श्रद्धा मात्र ऍक्टिग आणि डान्स दोन्हीकडे स्ट्रगलच करताना दिसतात. डान्स फिल्म म्हटल्यावर त्याचा हॉलीवूडच्या स्टेप अप फ्रँचाइजीशी तुलना होणे अटळ आहे. त्यातल्या क्रिएटीव्ह डान्सच्या तुलनेत अजून आपला चित्रपट खूप मागे आहे. ज्या दिवशी चित्रपटाच्या बिझिनेसवरून लक्ष कमी करून, स्टार ऍक्टर्सच्या जागी निर्मात्यांनी डान्सर्स ना कास्ट केलं तर एका स्टारला महत्व न मिळता डान्स प्राधान्य मिळेल आणि कदाचित हे चित्र बदलेल.