हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी गणेशोत्सवाच्या निमिताने जगभरात ठिकठिकाणी बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले. लोकमान्य टिळक यांनी लोकांमध्ये एकोपा निर्माण व्हावा म्हणून लोकोत्सव अर्थात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. हा उत्सव अत्यंत आनंददायी आणि हर्ष निर्माण करणारा आहे. पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या मुर्त्यांचे समुद्रातून वाहून येणारे अवशेष अत्यंत जिव्हारी लागणारे दृश्य असते. यामुळे एकतर देवाची विटंबना होते आणि दुसरं म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. तो होऊ नये म्हणून आता अनेक लोक इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतात. शिवाय लोकांना पर्यावरण संबंधित विविध संदेश देणारे देखावे देखील केले जातात. असाच देखावा अभिनेता सुबोध भावे यांच्याही घरी करण्यात आला आहे.
मराठी अभिनेता सुबोध भावे यांच्या घरात दरवर्षी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन होते. भावेंचा गणेशोत्सव हा पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन साजरा केला जातो. या घरातील बाप्पाचे लहानगे फॅन दरवर्षी बाप्पाची आरास अतिशय सुंदर तयार करतात. यंदाही या चिमुकल्या मंडळींनी बाप्पाची आरास सजवत एक सुंदर देखाव्याची निर्मिती केली आहे. अवाढव्य वस्तू किंवा अवाजवी खर्च न करता अतिशय सुंदर देखावा साकारून त्यांनी लोकांना एक संदेश देऊ केला आहे. याबाबत माहिती देणारी पोस्ट सोबोध भावेंनी केली आहे.
अभिनेता सुबोध भावे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपल्या मुलांचा बाप्पासोबतचा फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘श्री गणेशाचं आगमन आज झालं. सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा.. आमच्या घरच्या देखाव्याची कल्पना आणि सादरीकरण या वर्षीही मुलांनी केलं. “आनंदी पृथ्वी आणि दुःखी पृथ्वी” निसर्गाचा सांभाळ केला तर आनंदी पृथ्वी आणि निसर्गाचा नाश केला तर दुःखी पृथ्वी. नवीन पिढीला निसर्ग जपण्याचं महत्त्व कळतंय. निसर्ग जपण्याची बुध्दी आणि शक्ती आपल्या अंगी येवो हीच गणराया चरणी प्रार्थना.. गणपती बाप्पा मोरया..!’
Discussion about this post