हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ने टीआरपीच्या शर्यतीत आपले टॉप १० मधील स्थान कधीच सोडले नाही. मालिकेचे कथानक, मालिकेतील पात्र आणि दररोज येणारे ट्विस्ट हे नेहमीच प्रेक्षकांना भावले आहेत. सध्या या मालिकेचं कथानक अतिशय वेगळ्या आणि उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपलं आहे. या मालिकेने एकदम ६ वर्षांनी पुढे उडी घेतली आहे. मालिकेतील मुख्य पात्र असणाऱ्या जयदीप आणि गौरी यांच्या नात्यात एक वेगळंच वळण आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच गौरीने मुलीला जन्म दिला आणि ती आई झाली. शिर्केपाटील यांच्या घरात चिमुकलीच्या आगमनाने अगदीच आनंदाचं वातावरण होतं. मात्र शालिनीला या कुटुंबाचा आनंद काही पाहवत नव्हता. दरम्यान शालिनीपासून आपल्या मुलीला धोका आहे अशी शंका वारंवार जयदीपला त्रास देत होती. या विचारांनी अस्वस्थ जयदीपने आपल्या लेकीला सुरक्षित ठेवण्यासाठी या घरापासून दूर नेण्याचा निर्णय घेतला. यामुळे तडकाफडकी लेकीला घेऊन निघून गेलेला जयदीप आपल्या लेकीसोबत नक्की गेला कुठे..? असा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या बराच काळापासून जयदीप आणि त्याची लेक लक्ष्मीचा काहीही पत्ता नव्हता. एव्हाना शालिनीने तर जयदीपचा मृत्यू झाला असं जगभर सांगितलं होत. मात्र गौरीला जयदीप आणि लक्ष्मी सुरक्षित आहेत असा नेहमीच विश्वास होता.
यानंतर मालिकेने आता ६ वर्षांनी पुढे उडी घेतली आहे. या लीपनंतर गौरी- जयदीपची लेक लक्ष्मी आता मोठी झाल्याचे दाखवले आहे. हि भूमिका बालकलाकार साईशा साळवी साकारत आहे. मालिकेच्या सेटवर लक्ष्मीने म्हणजेच साईशाने सगळ्यांची मन जिंकली आहेत. मालिकेच्या नव्या टीमसोबत तिची भारी गट्टी जमली आहे. त्यामुळे सेटवर साईशा सगळ्यांची लाडकी ठरली आहे. साईशा मुळ पुणेकर असून तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. आतापर्यंत तिने काही जाहिराती आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम केलंय. याआधी स्टार प्रवाहवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील ओवी हे पात्र तिने साकारले होते.
Discussion about this post