हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल दिनांक ४ जून २०२३ रोजी कला क्षेत्राला ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनाचा धक्का बसला. सुलोचना दीदी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले असून त्या ९४ वर्षांच्या होत्या. माहितीनुसार, दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली अन सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. सुलोचना दीदी यांच्या निधनाने संपूर्ण कला विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सोशल मीडियावर चाहते, कलाकार मंडळी तसेच राजकीय मंडळी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
Mumbai | Veteran actor Sulochana Latkar passes away at the age of 94 years, confirms the hospital where she was admitted
— ANI (@ANI) June 4, 2023
सुलोचना दीदी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर, चाहत्यांवर आणि संपूर्ण मनोरंजन विश्वावर मोठा आघात झाला आहे. आज सोमवार दिनांक ५ मे २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुलोचना दीदींचे पार्थिव त्यांच्या प्रभादेवी येथील घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यानंतर आज सायंकाळी ५ वाजता दादर, शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान सुलोचना दीदींच्या अंतिम दर्शनासाठी नातेवाईक, कलाकार मंडळी तसेच राजकीय मंडळी साश्रू नयनांनी उपस्थित राहताना दिसत आहेत.
सुलोचना दीदी यांनी मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही मोलाचे योगदान दिले आहे. सुलोचना दीदींची कारकीर्द कोल्हापुरात भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली आणि त्यानंतर जयशंकर दानवे यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी पहिल्यांदा रंगमंच गाजवलं. हा प्रयोग शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी झाला होता. सुलोचना दीदींनी अमिताभ बच्चन, शशी कपूर, धर्मेंद्र यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत रुपेरी पडदा गाजवला आहे. याशिवाय पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
Discussion about this post