हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात चांगलाच वाद पेटल्याचे आपण पाहिले. आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे ट्रोल होणाऱ्या उर्फीवर चित्रा वाघ यांनीही ताशेरे ओढले. यावर उर्फी जावेदनेही पलटवार केला. चित्रा वाघ यांनी उर्फीला पोलिसांनी बेड्या ठोकाव्या असेही म्हटले. शिवाय उर्फीचे प्रताप थांबले नाहीत तर ती दिसेल तिकडे थोबडवणार असेही त्या बोलल्या. या वादात आता शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेत उर्फीच्या जातीचा मुद्दा उकरलाय. जे पाहता उर्फी जावेदचे कपडे आता राजकीय मुद्दा झाला आहे असे दिसून येत आहे.
तर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला..?’ असा चित्रा वाघ याना केला आहे. या पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट.पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…’
पुढे लिहिलंय कि, ‘अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवालही त्यांनी केला आहे. जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना (म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीस यांना) मारहाणीची भाषा कराल का? शेवटी त्यांनी, नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धीझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल..?’
शी…ऽऽऽऽ
अरे..हे काय चाललयं मुंबईत
रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला @MumbaiPolice कडे
IPC/CRPC आहेत की नाहीतात्काळ बेड्या ठोका हीला
एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये @CPMumbaiPolice pic.twitter.com/M1loh1Mhge— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 30, 2022
दरम्यान चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी उर्फी जावेदला असे चाळे करू देणार नाही. आम्ही हे चालू देणार नाही.. तर टोकाची भूमिका घेऊ, शेवटपर्यंत लढा देऊ पण उर्फीला धडा शिकवू असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय उर्फीवर कारवाई करण्यासाठी मी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तरीही उर्फीचे प्रताप थांबले नाहीत तर तिला दिसेल तिथे थोबडवणार, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. यावर उर्फीने नेहमीप्रमाणे तिला फरक पडत नसल्याचीच भूमिका घेतली आहे.
Discussion about this post