हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दुःखद अशी बातमी समोर येत आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या आगामी मराठी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाल्याचे हे वृत्त आहे. व्हायच्या ४६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांनाच दुःखद धक्का दिला आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा त्यांचा पहिला दिग्दर्शन आणि लेखन केलेला चित्रपट असून काळजात चर्रर्र करणारी बाब अशी कि येत्या ५ मे २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
आपल्या पहिल्याच दिग्दर्शित अन लिखित चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच स्वप्निल यांचे निधन झाल्याने संपूर्ण सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल मयेकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूचा त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. यापूर्वी स्वप्नील मयेकर यांनी हा ‘खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. शिवाय एका भोजपुरी चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते.
स्वप्निल मयेकर दिग्दर्शित आणि लिखित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यांच्या पहिल्याच दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाचे कथानक खानदेशातील शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या एक तरुणावर आधारित आहे. हा युवक मुंबईत व्यावसायिक बनण्यासाठी येतो. या युवकाभोवती संपूर्ण कथानक फिरते आणि यामध्ये त्याची संघर्षकथा मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न स्वप्नील यांनी आपल्या लिखाणातून आणि दिग्दर्शनातून केला आहे. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. यामुळे सिनेसृष्टीसह प्रेक्षकांमध्येही शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
Discussion about this post