हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्व स्तरावर सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. लव जिहादच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्टपणे भाष्य करणारा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात असूनही चांगली कमाई करताना दिसतो आहे. कुणी बहिष्कार टाकला, कुणी प्रदर्शन रोखले, कुणी टीका केली तर कुणी आणखी काही. पण तरीही हा चित्रपट प्रदर्शित झालाचं. या चित्रपटाच्या समर्थानात अनेक कलाकार तसेच राजकीय नेतेमंडळी उभे राहताना दिसले. मध्यंतरी मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीदेखील हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. यानंतर आता याच चित्रपटाचा आधार घेत त्यांनी सावरकरांचे नाव घेत हिंदूंचे कान टोचले आहेत.
या व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली कादंबरी ‘काळे पाणी’चे वाचन करताना दिसत आहेत. हे पुस्तक वाचताना पोंक्षे यांनी नेटकऱ्यांशी संवाद साधत म्हटले आहे कि, ‘काय बघताय..? मी काय वाचतोय..? ‘काळे पाणी’.. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली ‘काळे पाणी’ ही कादंबरी.. सध्या जे सुरू आहे.. म्हणजे ‘द केरला स्टोरी’ पाहून सगळे हिंदू जागे झाले आहेत. पण सावरकर गेली सव्वाशे वर्षे हिंदूंना जागृत करण्यासाठी धडपडत आहेत. १९६६ मध्ये ते गेले, पण आमच्यासारख्या व्याख्यात्यांच्या माध्यमातून आम्ही सावरकर मांडायचा प्रयत्न करतो’.
पुढे म्हणाले, ‘सावरकरांनी संपूर्ण आयुष्य हिंदू धर्म आणि हिंदुत्वासाठी वेचलं. तरीही हिंदू एक होत नाहीये. अजूनही जागा होत नाहीये यासारखं दुःख नाहीये. ऐकू या सावरकर, वाचू या सावरकर. आपण सगळ्यांनी एक होऊ या. हिंदू धर्मातील सर्व जाती संपवून हिंदू ही एकमेव जात निर्माण करूया. हेच या माणसाने स्वप्न पाहिले. ते आपण पूर्ण करू या’. असे म्हणत शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा हिंदूंना एकवटण्याचा संदेश दिला आहे. शरद पोंक्षे यांच्या इतर व्याख्यानांच्या व्हिडीओप्रमाणे हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Discussion about this post