हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘झी चित्र गौरव’ या पुरस्कार सोहळ्याची प्रचंड चर्चा सुरु होती. अखेर हा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित असा सोहळा २६ मार्च २०२३ रोजी झी मराठी या वाहिनीवर प्रक्षेपित झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी मनोरंजन विश्वातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाला दिला जाणारा ‘जीवन गौरव’ पुरस्कार यंदा विनोदाचा बादशाह आणि मराठी सिनेसृष्टीचा जीव असलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात आला.
हा पुरस्कार देण्याआधी मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने मामांच्या कारकिर्दीची एक झलक आपल्या परफॉर्मन्समधून सादर केली आणि बस तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात लाघवी ठरला. याबाबत त्याने पोस्ट शेअर करून भावना व्यक्त केल्या आहेत.
सिद्धार्थ जाधवने इंस्टाग्रामवर अशोक मामांसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘अशोक सराफ… अशोक मामा… माझ्यासारख्या कित्तेक नवोदित कलाकारांसाठी असलेले द्रोणाचार्य आणि त्यांची मूर्ती मनात बसवून काम करू पाहणारे आम्ही एकलव्य…. त्याच्या पायाशी कधी बसायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण आयुष्यातला हा खूप मोठा क्षण आहे जिथे त्यांच्या आयुष्याची कहाणी त्यांच्या समोर मांडण्याची संधी मला मिळाली… आणि अशोक मामांना ती मनापासून आवडली.. भारावल्या डोळ्यांनी त्यांनी कौतुक केलं.. आशिर्वाद दिले… मामांना जीवन गौरव मिळाला हे आहेच पण त्यांच्यासमोर असा परफॉर्मन्स करून माझ्या जीवनाचं सार्थक झालं…. हा क्षण आयुष्यभर माझ्या लक्षांत राहील..’
सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. केवळ नेटकरीच नव्हे तर सिनेविश्वातील काही दिग्गज कलाकारांनी देखील या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. सावनी रवींद्र, प्रसाद ओक, विकास पाटील, ईशा केसकर अशा कलाकारांच्या नावाचा यात समावेश आहे. ‘झी चित्र गौरव’ या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव याने अशोक मामांच्या कारकिर्दीची बहारदार झलक आपल्या नृत्यातून सादर करत एक अनोखी मानवंदना त्यांना दिली. यावेळी अशोक मामांच्या डोळ्यातील आनंद आणि कौतुक अगदी स्पष्ट दिसत होते. शिवाय मनोरंजन विश्वातील युवा पिढीने मामांवर केलेला प्रेमाचा वर्षाव त्यांच्यासाठी गहिवरून टाकणारा प्रसंग ठरला. पुरस्कार सोहळ्यातील या भावुक प्रसंगी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते.
Discussion about this post