हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे…… बस नाम हि काफी है! या नावाने लोककलेचा वारसा जपलाय. आजही आणि अनंत काळापर्यंत हे नाव तितकेच गाजेल यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे उभ्या पिढीने अनुभवण्यासाठी त्यांचा नातू आणि मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक केदार शिंदे याने पुढाकार घेतला आहे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण जग गाजवले आहे. त्यांचे महाराष्ट्र गीत आजही नसानसांत शिरशिरी आणते. तर खंडोबाचा जागर मनामनांत भक्ती जागवते. याशिवाय त्यांच्या कोळी गीतांनी सर्वांनाच थिरकायला लावले आहे. अशा महाराष्ट्राच्या लाडक्या शाहीर साबळे यांच्यावर चित्रपट येतोय आणि यामध्ये त्यांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी दिसणार आहे.
शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ आजही तितकीच ज्वलंत आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात त्यांचा वारसा केदार शिंदे पुढे नेत आहेत. यानंतर आता तरुणांनाही शाहीर समजावे यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. काही दिवसांपूर्वीच केदार शिंदे यांनी चित्रपटाची घोषणा केली होती. यानंतर आता १ मे २०२२ रोजी शाहीर साबळे यांची भूमिका कोण साकारणार हे उघडकीस आले आहे. या भूमिकेत महाराष्ट्राचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी दिसणार आहे हे समोर येताच प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी हे राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात सामील झाले होते. मुंबई पासूनच ते राज ठाकरे यांच्या समवेत होते. खरतर चर्चा अशी होती कि सभेसाठी हे दोघे गेले आहेत. मात्र खरी बात अशी कि, चित्रपटाच्या घोषणेसाठी हा सारा अट्टाहास!
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अंकुश चौधरी याने शाहीर साबळे यांच्यासोबत काम केले आहे. विशेष सांगायची बाब अशी कि, केदार शिंदे, भारत जाधव, अंकुश चौधरी ही मंडळी शाहीर सांबळे यांच्या कला पथकातूनच सिने सृष्टीत दाखल झाली आहेत. त्यामुळे अंकुशसाठी ही भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे त्याने सांगितले. या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण रविवारी दिनांक १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथील सभेत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केदार शिंदे, अंकुश चौधरी दोघेही उपस्थित होते. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचा टिझर रिलीज करून शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अंकुश चौधरी असल्याचे जाहीर करण्यात आले असता चाहत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. हा चित्रपट येत्या वर्षात २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे संगीत अजय अतुल करणार आहेत असे समोर आले आहे.
Discussion about this post