हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेसृष्टीला नेहमीचं चकित करेल अशा कलाकृती घेऊन अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. त्याने साकारलेले बालगंधर्व आणि लोकमान्य टिळक ही पात्रे तर आजही लोकांच्या स्मरणात आहेत. एक उत्तम कलाकार असणाऱ्या सुबोध भावेला प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीस वेगळं आणि भावणारं साहित्य द्यायचं असत. याच वेगळेपणामुळे सुबोध भावे अनेकांना लाडका अभिनेता आहे. आता लवकरच ‘कालसूत्र- प्रथम द्वार मृत्यूदाता’ असं वेगळं शीर्षक असणाऱ्या वेब सीरिज च्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सुबोध सज्ज झाला आहे. ही त्याची पहिली वहीली वेब सीरिज असून अत्यंत थरार निर्माण करणारी ही कलाकृती आहे. याचा टिझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
अभिनेता सुबोध भावे ‘कालसूत्र- प्रथम द्वार मृत्यूदाता’ या सीरिज च्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. या सीरिजची निर्मिती स्वत: सुबोध भावे नेच केली असून याचे पोस्टरदेखील रिलीज झाले आहे. या सीरिजच्या पहिल्या पोस्टरमध्ये सुबोध आणि अभिनेते सयाजी शिंदे दिसले आहेत. माहितीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या वेब सिरीजच्या टिझरला कमालीचा प्रतिसाद मिळतो आहे. आपल्या आगामी आणि पहिल्याच वेब सिरीज बद्दल सुबोध भावेने अधिकृत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
यात त्याने लिहिलंय की, ‘आपल्या मराठी भाषेत एक उत्तम वेब सीरिज करावी आणि त्यात आपण काम करावं अशी खूप मनापासून इच्छा होती. रहस्य कथा हा माझ्या आवडीचा विषय. २०२० लॉकडाऊनच्या काळात सलील देसाई यांची एक रहस्य कादंबरी वाचनात आली. ती वाचून ठरवलं की ही आपल्याला करता आली पाहिजे. आज कादंबरी वाचून दोन वर्षानंतर त्यावर आधारित मराठीमधील पहिल्या भव्य अशा वेब सीरिजची घोषणा करताना मनस्वी आनंद होतोय. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या वेब सीरिजचं पहिलं पोस्टर प्रकाशित करतोय. नवीन वर्षात जानेवारी २०२३ मध्ये ही वेब मालिका तुम्हाला पाहायला मिळेल. हे स्वप्न पूर्ण करण्यात अनेकांचा हातभार आहे, निखिल साने, मंजिरी भावे आणि ज्योती देशपांडे (जिओ स्टुडिओ), तसंच माझ्या पडद्यावरील आणि पडद्यामागे काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. एक चित्तथरारक माईंड गेम! एक विकृत सिरियल किलर आणि एक कर्तबगार पोलिस अधिकारी.. जिओ स्टुडिओज घेऊन येत आहे मराठीतला पहिलाच थरारक आणि रोमांचकारी ॲक्शन थ्रिलर वेब शो.. ‘कालसूत्र – प्रथम द्वार | मृत्यूदाता’,’
Discussion about this post