हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रात मोठा सत्ता संघर्ष झाल्यानंतर शिंदे – फडणवीस यांचे नवे सरकार सत्तेत आले. गेल्या काही काळात राजकीय क्षेत्रात एव्हढी उलथा पालथं झाली कि, आता यामुळे सत्तेतील राजकारण, सत्ता संघर्ष, सत्ता नाट्य हे सगळंच महाराष्ट्रातील जनतेसाठी जुनं झालंय. राजकारणात चित्रपट, वेबसिरीजमधील विविध डायलॉग ची नेहमीच चर्चा असते. कदाचित म्हणूनच का काय.. एक नवीकोरी राजकीय घडामोडींना चिमटा काढणारी वेबसिरीज येतेय. ‘त्या’ ४० आमदारांचं काय झालं..? या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एक नवी वेबसिरीज प्लॅनेट मराठी ओटीटी घेऊन येत आहे. या वेबसिरीजचे नाव ‘मी पुन्हा येईन’ असे असून याचा टिझर नुकताच प्रदर्शित झालाय.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या गाजलेल्या डायलॉगचा टायटल म्हणून वापर करत ‘त्या’ चाळीस आमदारांवर झालेला गेम काय होता..? आणि हे सत्ता नाट्य रंगलं कसं.? हे येऊ घातलेल्या या वेबसिरीजमध्ये पहायला मिळेल. या वेबसीरिजचे लिखाण व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी केले आहे. तर निर्मिती प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मसह गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे. या वेबसीरिजमध्ये अत्यंत प्रभावशाली असे कलाकार आपल्या कलेची प्रतिभा दर्शवतील. यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर याचा समावेश आहे.
सध्या ‘मी पुन्हा येईन’ या वेबसिरीजच्या टीझरची चर्चा जोरदार सुरु आहे. कारण यामध्ये राजकारणातील अनेक घडामोडींवरील आधारित घटना मस्त तेल तिखट लावून खुमासदार पद्धतीने दाखवल्या आहेत. दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी फोडाफोडी करतात आणि पळवापळवी करतात..? हे यात दाखवले आहे. शिवाय शासकीय यंत्रणांचा यात कसा वापर करतात आणि अधिकारी वर्ग आपली पोळी कशी भाजतात..? हे टीझरमध्ये पाहता येईल. या वेब सीरिजमध्ये सत्तेची लालसा, कपट- कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची फोडाफोडी, पळवापळवी असे सध्या चर्चेत असलेले सगळेच विषय पहायला मिळणार आहेत.
आपल्या आगामी ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजबद्दल बोलताना प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले कि, ‘सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण जे आपल्या आजुबाजूला घडतं तेच सिनेमात किंवा वेबसीरीजमध्ये पहायला मिळतं. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी राजकीय कुरघोड्या, शह- काटशह हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरीज पूर्ण करेल.’
Discussion about this post