हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय क्रिकेट विश्वाचा देव म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला चाहते अक्षरशः पूजतात. खरंच क्रिकेट विश्वातील त्याची कारकीर्द आणि त्याची पॅशनची गोष्ट काही औरच आहे. त्याची कारकीर्द कुणासाठी प्रेरणा तर कुणासाठी अभिमानाची बाब आहे. गर्व करावा असा तारा आपल्या क्रिकेट विश्वाला मिळाला याहून आनंदाची बाब ती काय. आज जगभरात सचिनचे असंख्य चाहते आहेत. यांपैकी एकाने सचिनवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी थेट चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘तेंडल्या’ असे आहे. या चित्रपटाचा टीझर अलीकडेच प्रदर्शित झाला असून चांगलाच चर्चेत आहे.
‘अश्वमेध मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘तेंडल्या’ या चित्रपटाच्या टीझरची सोशल मीडियावर भारी चर्चा आहे. या टीझरची सुरुवात गावातील काही मुलांच्या क्रिकेट खेळण्याने होते. ही मुलं शेतात क्रिकेट खेळत असताना एक मुलगा गोलंदाजी करताना दाखवलंय. त्यानंतर ही सर्व क्रिकेट खेळणारी मुले जल्लोष साजरा करतात. या चित्रपटाचे कथानक खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांचं सचिन तेंडुलकरवर असणारं प्रेम आणि क्रिकेट जगतावर आधारित आहे. या चित्रपटाला आतापर्यंत ५ राज्य आणि १ राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटाची निर्मिती कोरोनापूर्व काळात झाली असून येत्या ५ मे २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'तेंडल्या' सिनेमा थिएटर मध्ये झळकायला आता फक्त ८० दिवस उरले #MarathiCinema #SachinTendulkar #Cricket #CricketTwitter #AaplyaMatitalaCinema #tendlya pic.twitter.com/zuEPf6cIPC
— Sunandan Lele (@sunandanlele) February 16, 2023
‘तेंडल्या’ हा मराठमोळा चित्रपट सचिन तेंडुलकर याने पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. सुनंदन लेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सचिनने हा चित्रपट पाहिला आहे. त्याला हा चित्रपट प्रचंड आवडला आणि त्याने या चित्रपटाचे, कथानकाचे, कलाकारांचे कौतुक केले आहे’. या चित्रपटात ओंकार गायकवाड, स्वप्नील पाडळकर, राज कोळी, हर्षद केसरे, महेश जाधव, आकाश तिकोटी हे कलाकार दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना हे कलाकार ११ वी आणि १२ वी पर्यंत शिक्षण घेत होते.
Discussion about this post