हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’मध्ये विविध पात्र साकारून प्रेक्षकांना हात न लावता गुदगुल्या करून हसवणारा कुशल सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. एक उत्तम अभिनेता म्हणून वावरताना अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तो विविध पोस्ट लिहीत व्यक्त होत असतो. विविध विषयांवर, वास्तविक जगण्यातील भास आभास आणि परखड सत्य दर्शविणारी त्याची लेखणी आता नेटकऱ्यांनाही आवडू लागली आहे. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना कुशल अनेकदा नेटकऱ्यांच्या काळजाला हात घालतो आहे. आजही त्याने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टसोबत त्याने स्वतःचा अतिशय शांत डोळे मिटून बसलेला एक फोटो शेअर केला आहे.
कुशलने हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘Struggle काळातल्या ट्रेनच्या प्रवासात, कधीकधी चुकून डुलकी लागायची, थोड्यावेळाने डोळे उघडले की आजूबाजूला वेगळीच माणसं दिसायची, खिडकीतून बाहेर डोकावलं तर वेगळेच रस्ते, वेगळ्याच बिल्डिंग्स, आणि मग लक्षात यायचं, की सालं आपण उतरायचं ”स्टेशन” तर मागेच राहून गेलं ! मग पुढल्या एखाद्या अनोळखी स्टेशनला उतरायचं, अनोळखी पाट्या, अनोळखी स्टॉल्स, अनोळखी माणसं. पण इंडिकेटर वरची “रिटर्न ट्रेन” मिळेपर्यंत, सगळं ओळखीचं होऊन जायचं. आयुष्याचा प्रवासही थोड्याफार फरकाने असाच असतो, नाही का? आपण थांबायचं ठिकाण चुकलं की मग एका अनोळखी जगाचा प्रवास सुरू होतो…. फक्त आयुष्याच्या प्रवासात कोणत्याच इंडिकेटरला रिटर्न ट्रेन नसते. आपलं उतरायचं स्टेशन आणि माणसं एकदा चुकली, की चुकली.. (सुकून)’.
कुशलच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि कलाकार मंडळी यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर कमेंट करत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने लिहिले आहे कि, ‘कुठे थांबायचं हे माहीत असणं फार महत्त्वाचं! हल्ली आपल्याला त्याचाही विसर पडलाय.. लिहीत जा.. छान लिहितोस !’ तर एका चाहत्याने लिहिलं आहे कि, ‘मला ना आज वाचताना भीतीच वाटली.. वास्तवाची जाण झाली.. खाडकन कानाखाली लावल्यावर माणूस कसा जागा होतो.. अगदी तसंच’. तसेच आणखी एकाने लिहिले कि, ‘इतकं मार्मिक आहेना तुझं लिखाण, डोळ्यात पाणी येतं अक्षरशः दादा..’. अशा अनेक प्रतिक्रियांमधून नेटकऱ्यांनी कुशलच्या लिखाणाचे पुन्हा एकदा भरभरून कौतुक केले आहे.
Discussion about this post