हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज १९ फेब्रुवारी असून संपूर्ण राज्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आजच्या दिवशी ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा विविध पद्धतीने पिढीसमोर उभी केली जाते. यासाठी आजतागायत अनेक ऐतिहासिक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे. शिवरायांचा जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या या मालिका, चित्रपट, गाणी, पोवाडे अतिशय लोकप्रिय आहेत. इतकेच काय तर या प्रत्येक सादरीकरणात ज्या कलाकाराने शिवरायांची भूमिका साकारली त्या कलाकारासाठी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच आदर आहे. कारण राजा कसा असावा? तर माझ्या शिवबासारखाच असावा असा या मातीचा इतिहास आहे.
आतापर्यंत लोकप्रिय कलाकृतींमधून शिवरायांच्या प्रतिमेला किंचितही गालबोट न लावता ज्या कलाकारांनी इतिहास जिवंत ठेवला त्या कलाकारांमध्ये अभिनेते अमोल कोल्हे, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, शरद केळकर या कलाकारांचा समावेश आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून महाराजांना अभिवादन केलं आहे.
अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर तान्हाजी या हिंदी चित्रपटात शरद केळकरने महाराजांची भूमिका केली आहे. याशिवाय चिन्मय मांडलेकर याने फत्तेशिकस्त आणि नुकताच प्रदर्शित झालेला पावनखिंड या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर प्रसाद ओकने हिरकणी या चित्रपट महाराजांची भुमिका साकारली आहे.
View this post on Instagram
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीनिमित्त महाराजांना अभिवादन करीत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी बंगळूर येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शिवगर्जना केली आणि राजेंना अभिवादन केले. शिवाय ते आज स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेच्या विशेष भागात पुन्हा एकदा शिवरायांची भूमिका साकारताना पहायला मिळणार आहेत. याविषयीची पोस्टदेखील त्यांनी शेअर केली आहे.
अभिनेता शरद केळकर यांनीदेखील आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हीडिओ पोस्ट शेअर केली आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले कि, ”अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा”! याशिवाय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी एक फोटो शेअर करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “जय भवानी… जय शिवराय..!!!”, असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यानेदेखील आपल्या षिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले आहे.
Discussion about this post