हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आयोजित मास्टर क्लास’मध्ये करून यांनी ‘थिंकिंग इमेजेस’ याविषयावर मार्गदर्शन केले. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्वाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते उपस्थित होते. कार्यक्रमात नखाते यांनी करुन यांच्याशी संवाद साधला.
मूळचे केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्याचे रहिवासी असणारे ७१ वर्षीय करुन यांनी अनेक चांगल्या कलाकृती घडविल्या आहेत. गेल्या २५ वर्षांतील ते एकमेव व्यक्ती आहेत ज्यांचा चित्रपटाची कांन्स चित्रपट महोत्सवाचा स्पर्धात्मक विभागात निवड झाली होती. करुन म्हणाले, ‘सिनेमा हे एक प्रवाही माध्यम आहे. त्यामुळे त्यातील मोकळ्या जागेचे महत्व समजून घेण्याची गरज आहे. रंग, संगीत, एखादी वस्तू अशा विविध घटकांच्या सहाय्याने या मोकळ्या जागेचा वापर कलात्मक स्वरूपात करता येऊ शकतो. सिनेमात प्रत्येक इमेज ही मौल्यवान असते. त्यामुळे ती इमेज घडविताना तुमचे लक्ष पूर्णपणे त्यावर केंद्रित असावे. ज्यावेळी तुम्ही तुम्हाला हवी असलेली इमेज यशस्वीपणे साकारता त्यावेळी ती एक ऐतिहासिक कलाकृती बनते.’
आपल्या मनात असणाऱ्या लक्षावधी आठवणी आणि आपल्या डोक्यातील असंख्य विचार यांचे एक विस्तृत चित्रण म्हणजे सिनेमा आहे. गणिती विश्लेषण आणि विज्ञानाच्या जोडीने सिनेमा ही एक उत्कृष्ट कलाकृती बनू शकते. ही कलाकृती तुम्हाला आनंद आणि अध्यात्म या दोघांची अनुभूती देते, असेही करुन यांनी यावेळी सांगितले.
Discussion about this post