हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करून राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे अनेक महिने ताटातूट झालेल्या प्रत्येकाचे आता मनापासून स्वागत होणार. अखेर मोठ्या संघर्षानंतर २२ ऑक्टोबर २०२१ पासून रंगभूमीचा पडदा उघडणार. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा येथे एका लग्नाची पुढची गोष्ट या मराठी नाटकाचा पहिला प्रयोग जोरदार रंगणार आहे. अनलाँकनंतर नाट्यगृहाचा पडदा उघडण्यास उशीर झाला असला तरीही अखेर उघडतोय हे महत्वाचं आहे.
आता तिसऱ्या घंटेचा पुन्हा नाद घुमणार आणि रंगकर्मी पुन्हा मानाने जगणार हि नुसती कल्पनाच आनंददायी आहे. महत्वाचे म्हणजे २२ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ वा. वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांच्या गाजलेल्या “एका लग्नाची पुढची गोष्ट” या नाटकाचा खास प्रयोग होणार आहे. यावेळी शासनाच्या नियमांचे पालन करून ५०% क्षमतेनेच विनामूल्य प्रवेश रसिकांना देणार आहेत. अगदी रेड कार्पेट अंथरून आणि गुलाबाचे फुल देऊन नाट्य रसिकांचे स्वागत करण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी काही मराठी कलावंतानादेखील खास आमंत्रित करण्यात येणार आहे.
० काय आहेत नियम?
१) सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची/आयोजकांची जबाबदारी असेल.
२) बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये.
३) बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान 6 फूट) आवश्यक राहिल.
४) बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.
५) बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहिल.
६) आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल करुन ते दिवसभर सुरु ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार/ आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल.
७) बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅपवरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्यदृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती “सुरक्षित” अशी दर्शवलेली असणे आवश्यक राहील.
८) सभागृहातील सर्व परिसर / खोल्या / प्रसाधनगृहे वेळोवेळी स्वच्छ करणेबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखणे आणि प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. तसेच, वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. प्रशासन याशित सर्वांनी मास्क लावणे आवश्यक राहील.
Discussion about this post