हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखेर २ वर्षानंतर राज्यातील सर्व चित्रपटगृहे प्रेक्षकांसाठी ५०% क्षमतेने सुरु करण्यात आली आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून आता प्रेक्षक दिलखुलासपणे मनात येईल तेव्हा चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जाऊ शकतात. यानंतर एकापेक्षा एक चित्रपटांच्या प्रदर्शनाचा सपाटा लागल्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजाचा धमाका झाला आहे. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकण्याचे ठरवले आहे. त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे.
View this post on Instagram
मुख्य म्हणजे हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होण्याच्या एक महिना आधीच अमेरिकेत धुमाकूळ घालत आहे. खेर यांचा काश्मीर फाईल्स हा एक हार्ड हिटिंग चित्रपट आहे. जो आगामी वर्षात चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनुपम खेर यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रपटाचे कथानक कलम ३७० रद्द करण्यावर आधारित आहे. त्यामुळे चित्रपटातून एक वेगळेसे कथानक आपण अनुभवणार आहोत.
अनुपम खेर यांनी हे पोस्टर शेअर करताना लिहिले कि, मी #TheKashmirFiles मधील माझा परफॉर्मन्स माझे वडील #पुष्करनाथ जी यांच्या स्मृतीस समर्पित केला आहे. मी #पुष्कर चित्रपटातील माझ्या पात्राचे नाव देखील ठेवले आहे. माझ्यासाठी हा चित्रपटापेक्षा जास्त आहे. 30 वर्षांहून अधिक काळ जगापासून लपवून ठेवलेले लाखो #काश्मीरीपंडितांचे #सत्य आहे. शेवटी ते २६ जानेवारी २०२२ रोजी उघड होईल. माझा पहिला लूक तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे! कृपया सत्याचा प्रसार करण्यात आम्हाला मदत करा. धन्यवाद.
चित्रपटाच्या पोस्टरच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे अनुपम खेर यांचा भारदस्त आवाज. ज्यामध्ये काश्मीर हा नेहमीच ऋषी, संत आणि साधूंचा देश म्हणून कसा ओळखला जातो हे सांगण्यात आले आहे. अनुपम खेर यांनी मोशन पोस्टर शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांनी तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक पुष्कर नाथ पंडित यांची भूमिका साकारली आहे. यातील त्यांनी साकारलेले पात्र अतिशय रोमांचक आहे. चित्रपटातील नायकाचा मुलगा, सून आणि दोन नातवंड श्रीनगर स्थित आहेत. मात्र १९ जानेवारी १९९०च्या काळ्याकुट्ट रात्रीत त्यांना काश्मीरमधून पळून जावे लागले. हा या कथेचा साचा असून यापुढे काय होणार तो चित्रपटाचा मुख्य आणि रंजक भाग आहे.
Discussion about this post