हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्यावर्षी शिवसेनेचा वाघ स्व. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर या वर्षात धर्मवीर चित्रपटाच्या भाग २ ची घोषणा झाली. एका लोकनेत्याच्या जीवनावर आधारित चित्रपट इतका हिट होताना प्रेक्षकांनीही पहिल्यांदाच पाहिला. यानंतर आता महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आयुष्यावरील एक बहारदार कलाकृती आपल्या भेटीला येत आहे. मुख्य म्हणजे हा कोणताही चित्रपट नसून एक दोन अंकी नाटक आहे ज्याचे नाव आहे ‘बाळासाहेबांचा राज’.
‘बाळासाहेबांचा राज’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येऊ घातलं आहे. हे एक दोन अंकी नाटक असून याचा शुभारंभ हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त येत्या सोमवारी दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे दुपारी ४.३० वाजता या नाटकाचा शुभारंभ प्रयोग आयोजित केला आहे.
या शुभारंभ प्रयोगाला राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. नुकतेच मकर संक्रातीच्या मुहूर्तावर या नाटकाच्या सन्मानिकेचे उदघाटन मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय नाटकाच्या पोस्टरचे उदघाटन मनसे ठाणे/पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नाटकातील कलाकार सचिन नवरे, प्रफुल आचरेकर, नितीन बोढारे हे हजर होते. शिवाय नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक अनिकेत बंदरकरदेखील उपस्थित होते. या नाटकाची निर्मिती प्रमोद गांधी यांनी केली आहे. आजतागायत अनेक सिनेमांमध्ये आपण ठाकरे कुटुंबातील भावनांचे बंध पाहिले असतील. पण या नाटकाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीवर बाळासाहेब आणि राज यांच्यातील भावनिक नात्याचे बंध आपल्याला पहायला मिळणार आहेत. हे एक व्यावसायिक नाटक असल्यामुळे याचे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयोग रंगणार आहेत. आता उत्सुकता एकच कि, हे नाटक प्रेक्षकांना आणि तमाम शिवसैनिक तसेच मनसैनिकांना भावणार का..?
Discussion about this post