हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला चित्रपटातील गाणी सज्ज झाली आहेत. या चित्रपटातील विविध ढंगाच्या गाण्यांचा नुकताच भव्य म्युझिक लाँच सोहळा पार पडला आहे. यावेळी दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे, नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे आकाश ठोसर, सायली पाटील, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, गीतकार वैभव देशमुख, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या चित्रपटातील प्रत्येक गाणे श्रवणीय आणि सुंदररित्या चित्रित करण्यात आले आहे. व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने ‘गुन गुन’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांचा सुमधुर आवाज लाभलेले गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळणारे आहे. यानंतर म्युझिक लॉन्च सोहळ्यात ‘आहा हेरो’ हे नवे गाणे प्रदर्शित करण्यात आले. सोबतच ‘घर बंदूक बिरयानी’चे मेकिंगही दाखवण्यात आले. या म्युझिक लाँच सोहळ्यात ‘आहा हेरो’ गाण्यावर गाण्यातील कलाकार आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी ठेका धरला. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटातील गाण्यांबद्दल बोलताना संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणाले कि, ‘चित्रपटातील गाणं हे केवळ गाणं नसून तो कोणाच्या आयुष्याचा प्रवास असतो, भावना असतात. त्यामुळे त्याला संगीतही त्याच धाटणीचे हवे. नागराज सरांसोबत मी याआधीही काम केलं आहे. चित्रपटाच्या छोट्याछोट्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष असते. संगीतामध्येही त्यांचा तितकाच सहभाग असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपसुकच जुळून येतात’.
तसेच झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले कि, ‘बिर्याणीमध्ये सगळे जिन्नस असतात आणि त्याची प्रत्येकाची एक खासियत असते, जी बिर्याणीला अधिक चविष्ट बनवतात. तशीच या चित्रपटात विविध प्रकारची गाणी आहेत, जी संगीतप्रेमींना नक्कीच आवडतील आणि मुळात नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी ही खासच असतात. तशीच ‘घर बंदूक बिरयानी’तीलही आहेत’.
Discussion about this post