हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा आपल्या भेटीस येणार आहे. येत्या २ मे पासून दर रविवारी सायंकाळी ६ वाजता या मालिकेचे स्टार प्रवाह वाहिनीवर पुनः प्रक्षेपण होणार आहे. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे यांच्या दर्जेदार अभिनयाने साकारलेली ‘जिवलगा’ ही मालिका पुन्हा एकदा पाहता यावी अशी मागणी प्रेक्षकांकडून वाहिनीकडे वारंवार केली जात होती. याची दाखल घेत अखेरीस वाहिनीने हि मालिका पुनःप्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मालिकेचे नुकतेच २ वर्ष पूर्ण केले आहेत. या निमित्ताने मालिकेतल्या कलाकारांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. या व्हिडिओला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. शिवाय पुन्हा एकदा ही मालिका पहायला मिळावी अशा समीक्षण उधाण आला होता. त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘जिवलगा’ हि प्रेमाच्या रंगानी रंगलेली मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पहाता येणार आहे.
जिवलगा मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले आहे. या मालिकेचे शीर्षकगीत आजही प्रेक्षकांच्या मनामनावर राज्य करीत आहे. या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून या मालिकेच्या कथानकांसाठी प्रेरणा घेतलेली आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. तर पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रित करण्यात आली आहे.
“जिवलगा’ ही एक खिळवून ठेवणारी आणि मनामनाला भिडणारी अशी प्रेमकथा आहे. अगदी प्रेक्षकांच्या ती दीर्घकाळ लक्षात राहील अशी आहे. परस्परसंबंधांवर आधारित ही कथा शेवटी जे योग्य आहे त्याच्या बाजूने प्रवाहाप्रमाणे वाहत जाते. ‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक विशेष पैलू उलगडताना दिसतात. स्वभाव आणि त्यातील प्रगल्भता व वैचारिक शैली यांची एक अनोखी बांधणी या कथेतून पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.
बऱ्याचदा आपल्याकडून आपणच जोडलेली नाती आणि आपली माणसं समजून घेण्यात चुकतो. आपल्या सभोवताली असणाऱ्या माणसांबाबतही आपण अंदाज लावताना कित्येकदा चुका करतो. या अश्याच भावनिक बंध आणि त्यातील चुका आयुष्यात किती प्रभावी असतात याबाबत ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हे या कथेतून मुख्यत्वे अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे ही कथा प्रत्येक वयातील प्रेक्षकांना आपलीशी वाटते.
Discussion about this post