हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेकदा वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत राहिलेले किरण माने वयाच्या ५२ व्या वर्षी बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभाग झाले आणि थेट टॉप ३ पर्यंत पोहोचले. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी आपले भक्कम स्थान निर्माण केले आणि आता पुन्हा एकदा त्यांचा मोर्चा सोशल मीडियाकडे वळला आहे. एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी इशारा दिला आहे. पण हा इशारा कुणासाठी आणि कशासाठी आहे..? हा काही धमकीचा इशारा नाही बरं का तर हि आहे नवी नांदी. किरण माने यांनी ७ वर्षापूर्वीची आठवण शेयर करत काहीतरी नवं येत असल्याची माहिती दिली आहे.
या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलंय की, ‘सात वर्षांपूर्वी मी केलेल्या नाटकाची गोड आठवण वर आली आज. फ्लॅशबॅक. नाटकात दोनच पात्रं…जयंत ! वय पंचेचाळीस. सातारी गावरान रांगडा गडी. जुन्या बिल्डींग डिमाॅलीश करण्याचा व्यवसाय असलेला ‘ब्रेकिंग काॅन्ट्रॅक्टर’. लाख्खो रूपये कमावणारा, पण लग्नाचं वय उलटून गेलं तरी लग्न न झालेला. भला माणूस. लग्न करून चारचौघांसारखा संसार थाटावा अशी लै इच्छा असूनही, आता सगळी आशा सोडलेला… प्राची ! वय अडतीस. पुण्यात एकदम पाॅश सोसायटीत रहाणारी माॅडर्न, बोल्ड, बिनधास्त मुलगी. लग्नाचं वय उलटलंय, पण ‘लग्न करायचंच नाही’ असं ठामपणे ठरवलंय तिनं. पुरूषद्वेष्टी. सगळे पुरूष एकजात सारखेच. आपमतलबी. शरीराची गरज म्हणून लग्न करणारे. त्यापलीकडेही स्त्रीला काही हवं असतं याचा विचार न करणारे. टिपिकल बुळ्या पोरींसारखं एखादं बुजगावणं पकडायचं आणि ‘मिस यू जानू लव्ह यू पिल्लू’ करत जन्म काढायचा….टिकल्या लावायच्या. हळदीकुंकवं करायची. त्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं.
‘…अशी ही जगावेगळी प्राची दरवर्षीप्रमाणं एकटीच बुलेटवरुन फिरायला निघते. बामणोलीला येते. एक रिमोट, ऑफ सिझन असल्यामुळं गर्दी नसलेलं शांत रिसाॅर्ट बुक करते. मस्त जंगलात फिरायचं, फोटोज काढायचे…शांतता अनुभवून ताजंतवानं व्हायचं, असं ठरवून. योगायोगाने जयंतही तिथं येतो. त्याच रिसाॅर्टच्या वरचा मजला डिमाॅलीश करायचं काम असल्यामुळं… दोघंही अनपेक्षितपणे एकमेकांना जोरदार भिडतात…भांडणं होतात. बेक्कार ठिणग्या उडतात. पण त्याच रात्री एक अशी भन्नाट, जबराट गोष्ट घडते की दोघंही मुळापासून हादरतात… पायाखालची जमीन सरकते… पूर्वी कधीच झाली नाही, अशी ‘आतमध्ये’ काहीतरी हलचल होते… आणि वरकरणी ‘परफेक्ट मिसमॅच’ वाटणार्या या दोघांत दोनच दिवसांत एक तरल, नाजूक, सुंदर नातं बहरू लागतं… अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून लै लै लै समाधान देणारं हे द्विपात्री नाटक. हिमांशू स्मार्तनं लिहीलेलं.. मी आणि अमृता सुभाषनं सादर केलेलं. सात वर्षांनंतर रिफ्रेश बटन दाबण्यासाठी हे नाटक पुन्हा एकदा करावंसं वाटतंय… प्लॅन सुरूय… जस्ट वेट ॲन्ड वाॅच..” अशी पोस्ट शेअर करत किरण माने यांनी लवकरच रंगभूमीवर येणार अशी माहिती दिली आहे.
Discussion about this post