हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित आगामी मराठी चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’चे मोशन पोस्टर बुधवारी रिलीज करण्यात आले. या पोस्टरमध्ये अंकुश चौधरीचा शाहिरी अंदाज लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे हे पोस्टर अल्पावधितच लोकप्रिय झाले आहे. दिग्दर्शक केदार शिंदे गेल्या वर्षभरापासून या चित्रपटापटासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. याची झलक या पोस्टरमध्ये साफ दिसतेय. म्हणूनच हे पोस्टर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अत्यंत बारकाईने पाहून आपल्याला आवडल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये या प्रसंगाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर, लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ #शाहीर_साबळे यांच्या आयुष्यावर आधारित केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित #महाराष्ट्रशाहीर या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण आज करण्यात आले. शाहिरांची धगधगती जीवनगाथा पडद्यावर मांडणाऱ्या या सिनेमाच्या संपूर्ण टीमला याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.’
यावेळी स्वर्गीय शाहीर साबळे यांनी गायलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला ‘महाराष्ट्र राज्य गीत’ म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केदार शिंदे यांनी साबळे कुटुंबियांच्या वतीने #युती सरकारचे आभार मानले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सिनेमाचे निर्माते संजय छाब्रिया, लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे, त्यांच्या पत्नी सौ.बेला शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी उपस्थित होते. हा चित्रपट येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post