हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी चित्रपटांची गळचेपी हा विषय अत्यंत ज्वलंत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांच्या ज्या प्रकारे थिएटरमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला अन प्राईम शो न देऊन कलाकृतींचा अपमान केला ते पाहून प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. आशयघन कथानक आणि विषयाला मोलाचा दर्जा असूनही मराठी चित्रपटांसमोर या समस्या उभ्या झाल्याने आता पुढे चित्रपट निर्मिती करताना १०० वेळा विचार केला जाईल असे वाटत आहे. अशातच आता ‘रावरंभा’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे समोर आले आले. याचे नेमके कारण काय ते जाणून घेऊ.
काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र शाहीर’ प्रदर्शित झाला. सुरुवातीला या चित्रपटाने तुफान कमाई केली पण पुढे काही दिवसांतच कमाई घसरली. शिवाय याच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘TDM’ला थिएटरमध्ये शो न मिळाल्याने दिग्दर्शकाने प्रदर्शनच थांबवले. त्यानंतर ‘बलोच’ आणि ‘द केरला स्टोरी’ एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने मोठा फटका बसला. अशातच ‘रावरंभा’बाबत मेकर्सने मोठा निर्णय घेत त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले. याबाबत कारण देताना त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये लिहिलंय कि, ‘युगप्रवर्तक शिवछत्रपतींच्या भारलेल्या काळाची पार्श्वभूमी असलेल्या आणि शौर्य पराक्रमात भिजलेल्या एका झुंजार मावळ्याची अनोखी प्रेम कहाणी म्हणजे रावरंभा हा चित्रपट.. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने चित्रपट उत्तम झाला आहे आणि तो सर्वांना नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी तो गौरविला. ज्याच्या केवळ ट्रेलरला काही तासात लाखोंची पसंती मिळाली आणि ट्रेडिंगमध्ये तो देशात अव्वल ठरला’.
पुढे, ‘असा हा महाराष्ट्राचा वैभवशाली रावरंभा चित्रपट येत्या शुक्रवारी १२ मे रोजी प्रदर्शित होण्याऐवजी काही तांत्रिक कारणांमुळे रसिकांची दिलगिरी व्यक्त करून दिनांक २६ मे २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात प्रदर्शित करीत आहोत. आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहू द्या. आपला शिवभक्त निर्माता शशिकांत शीला भाऊसाहेब पवार’. चित्रपट निर्मात्यांनी तांत्रिक कारण दिले असले तरी यामागे मराठी चित्रपटांबाबत गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. आता ‘रावरंभा’ १२ मे ऐवजी २६ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ओम भूतकर, मोनालिसा बागल, शंतनू मोघे, अशोक समर्थ, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, रोहित चव्हाण, मयुरेश पेम, रुक्मिणी सुतार, शशिकांत पवार या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
Discussion about this post