हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बबन’, ‘ख्वाडा’ सारखे दर्जेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘TDM’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना आणि समीक्षकांना भावला. पण राज्यात बऱ्याच ठिकाणी ‘TDM’ चित्रपटाचे शो कॅन्सल केले गेले.
शिवाय चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याने मराठी सिनेमाची गळचेपी होत असल्याचे दिसून आले. दरम्यान दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, कलाकार आणि संपूर्ण टीमने हात जोडून भावनिक साद दिली होती. यावेळी त्यांना अश्रूही अनावर झाले. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
चित्रपटाची अशी चेष्टा होत असल्याचे पाहून अखेर भाऊराव कऱ्हाडे यांनी मोठा निर्णय घेतला. फेसबुक लाईव्ह करत त्यांनी तूर्तास TDM चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले. त्यांच्या या निर्णयाचा प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठिंबा दिला असला तरीही थिएटरमध्ये जैसे थे परिस्थिती पाहून हा निर्णय घेणे कऱ्हाडेंनी श्रेयस्कर समजले. दरम्यान याविषयी दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि TDM च्या कलाकारांनी एका प्रसिद्ध न्यूज पोर्टलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आता त्याच्यापुढे स्वतःचा जीव देण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही, असे म्हटले आहे.
यावेळी बोलताना भाऊराव कऱ्हाडे म्हणाले कि, ‘हा सिनेमा बंद पडला तर फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. मी ३.५ कोटींचं कर्ज घेऊन हा सिनेमा केला आहे. बऱ्याच बँकांचं कर्ज आहे माझ्यावर, मी सगळी माहिती देतो. माझ्या घरातून पैसे टाकून हा सिनेमा केलेला नाही, एक एक रुपया जोडून आम्ही यासाठी मेहनत घेतली आहे. अशी जर गळचेपी होत असेल तर हा एकप्रकारे कलाकारांचा खून आहे. आमची फक्त एकच माफक अपेक्षा आहे की, जे आमच्या वाट्याला यायचं आहे ते येऊ द्यावं’. यावेळी साश्रुनयनांनी त्यांनी आपली व्यथा मांडली. शिवाय इतर चित्रपटांना १५० तर ‘TDM’ला केवळ २० शो दिल्याचेही त्यांनी सांगितले.
Discussion about this post