हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येत्या काळात भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. एक मितभाषी नेतृत्व, कवी, संवेदनशील व्यक्तिमत्व आणि जगन्मित्र अशी अटल बिहारी वाजपेयी यांची ख्याती आहे. त्यांच्या बायोपिकचे नाव ‘अटल’ असून या सिनेमाचे दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव करणार आहेत. तर प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे नाव जाहीर झाले होते. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सिनेमातील पंकज त्रिपाठी यांचा वाजपेयींच्या रूपातील फर्स्ट लुक समोर आला होता. त्यांचा लूक पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता दर्शवली होती. यानंतर आता सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला असून शूटिंगला सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिली आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर टिमसोबतचा फोटो आणि मुहूर्ताचा फोटो शेअर करत रवी जाधव यांनी हि माहिती दिली आहे.
सिनेमाच्या मुहूर्ताचा फोटो शेअर करताना रवी जाधव यांनी सुंदर कॅप्शन लिहिले आहे. ‘जिसने बुझते उम्मीदों में क्रांति की लौ जलाई, शुरू हो रही है ऐसी ‘अटल’ कहानी!’ असं रवी जाधव म्हणाले आहेत. तर अटलजींची भूमिका साकरणाऱ्या अभिनेता पंकज त्रिपाठी यांनीदेखील एक फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये रवी जाधव आणि पंकज त्रिपाठी एकत्र दिसत आहेत. या पोस्टसोबत त्यांनी लिहिलंय कि, ‘श्री अटल बिहारी वाजपेयी जी’ जैसे महानुभाव व्यक्तित्व को साकार करने का अवसर मिला है, मुझे आशा है मैं इस महान व्यक्तिमत्व को न्याय जरूर दूंगा!’ या बायोपिकचे दिग्दर्शन रवी जाधव करत आहेत. तर लॉरेन्स डी कुन्हा सिनेमॅटोग्राफी करत आहेत. अद्याप सिनेमाची रिलीज डेट समोर आली नसली तरी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळत आहे.
Discussion about this post