हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवर लवकरच ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. तत्पूर्वी या मालिकेतील कलाकारांनी देवीच्या मूळ स्थानी म्हणजेच कार्ला (लोणावळा) येथे जाऊन एकवीरा आईचे दर्शन घेतले आहे. पुराणांनुसार, कार्ला येथील हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासी काळात बांधले होते. तसेच एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे. या देवीचा महिमा सांगणारी हि मालिका लवकरच येते आहे. दर्शनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मालिकेतील कलाकार अभिनेत्री मयूरी वाघ, अमृता पवार तसेच मालिकेचे निर्माते दिग्पाल लांजेकर, लेखक आणि निर्माते चिन्मय मांडलेकर, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, सोनी मराठी फ़िकशन हेड – सोहा कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री मयूरी वाघ म्हणाली कि, ‘या मालिकेत मी एकवीरा आईची भूमिका साकारत आहे. एकवीरा आईचे चमत्कार आपण ऐकले आहेत. अनेकांनी ते अनुभवले आहेत. संकटातून एकवीरा आई आपल्या भक्तांना कशी तारून नेते हे आता तुम्हाला आता पहायलाही मिळणार आहे. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळाव्या हे प्रत्येक कलाकाराला वाटत. आजपर्यंत मी अनेक भूमिका साकारल्या. मात्र एखादी पौराणिक भूमिका आपण करावी असं मला वाटत होत. त्यातच एकवीरा आईच्या आशीर्वादाने ही भूमिका चालून आली. यामध्ये एकवीरा आईची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. एकवीरा आईच्या भक्तांना ही मालिका आवडेल अशी अपेक्षा आहे.’
याशिवाय मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेत असलेली अभिनेत्री अमृता पवार आपल्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाली कि, ‘ ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेत मी तानिया नावाची भूमिका साकारत आहे. एकवीरा आईचे लाखों भक्तगण आहेत. त्यातलीच एक तानिया असून तिची एकवीरा आईवर खूप श्रद्धा आहे. अनेक संकटातून एकवीरा आई तानियाला मार्ग दाखवते. हा भक्तिमय प्रवास लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.’
या मालिकेत निषाद भोईर, अभिनय सावंत, सविता मालपेकर, मिलिंद सफई, धनंजय वाबळे यांच्याही मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ हि मालिका २८ नोव्हेंबर २०२२ पासून सोनी मराठीवर सुरु होत आहे. या मालिकेचे शीर्षक गीत दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले असून केवल वाळंज आणि जुईली जोगळेकर यांनी गायले आहे. हे शीर्षक गीत प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे.
Discussion about this post