हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप करणारे किरण माने हे नेहमीच या ना त्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण हे प्रकरण असं काही गाजलं होत कि अगदी मनोरंजन इंडस्ट्रीपासून ते राजकीय क्षेत्रापर्यंत सर्वत्र खळबळ उडाली होती. हे प्रकरण अलीकडेच शांत झाले असता आता पुन्हा एकदा किरण माने यांनी फेसबुकवर याच मालिकेविषयी एक जाळ पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला प्राइम टाइममधून काढून टाकून हि मालिका दुपारी प्रसारित होणार हे असे किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे विषयाला आणखीच हवा मिळाली आहे.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘प्रेक्षक लै लै लै नादखुळा असत्यात भावांनो… मला काल वाढदिवसाची सगळ्यात मोठी गिफ्ट कुनी दिली आसंल, तर ती प्रेक्षकांनी! जी गोष्ट भलेभले करू शकले न्हाईत, ती त्यांनी एका रट्ट्यात केली. एका माजोरड्या प्रॉडक्शन हाऊसचा नक्षाच उतरवला. कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सिरीयलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच ‘प्राईम टाईम’मधून लाथ घालून हाकलली. जी सिरीयल शहरी आणि ग्रामीण विभागात मिळून सलग दीड वर्ष बहुतांश एक नंबरवर आनि बर्याचदा पहिल्या तीन नंबरमध्ये असायची. ती तीन म्हैन्यात रसातळाला गेली. आता मे महिन्यापासून ती सिरीयल, अतिशय महत्त्वाच्या समजल्या जानार्या ‘स्पेशल प्राईम टाईम’ला दिसनार नाय. फक्त तीन म्हैन्यात हे घडलं. ह्याला म्हन्त्यात ‘पोएटिक जस्टिस’.
ही गोष्ट साधी नाय भावांनो. सर्वसामान्य जन्तेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचं लै लै लै खतरनाक उदाहरन हाय. ‘खरा न्याय’ सर्वसामान्य जन्तेच्या दरबारात असतो. लोकप्रतिनिधी निवडतानाबी जन्तेनं अशीच ताकद दाखवली तर भल्याभल्यांना धोबीपछाड बसू शकते, हे इतिहासानं दाखवून दिलंय. “ये पब्लीक है ये सब जानती है” असं त्यो राजेश खन्ना डोळं मिचकावत म्हनत नाचायचा, ते काय खोटं न्हाय. कुनाला वाटत आसंल आता किरन माने नाचत आसंल, खुश झाला आसंल. नाय भावांनो. लढाई संपलेली नाय. मी कायदेशीर मार्गानं लढून तो न्यायबी मिळवनारच हाय. सुट्टी देनार नाय या भंगारांना. पन काही ‘बिकाऊ’ कलाकारांनी माझ्यावर जे आरोप केले, त्या सगळ्यांना प्रेक्षकांनीच सनसनीत, कचकटून थोबाडीत देऊन उत्तर दिलं याचं समाधान मात्र नक्की हाय.
कुनीतरी सांगीतलं की ती सिरीयल आता दुपारी दाखवनारेत. हे तर लै बेक्कार भावांनो. एखाद्या यशस्वी पोलीस इन्स्पेक्टरचं अचानक एक दिवस डिमोशन करून त्याला ट्रॅफिक हवालदारची ड्यूटी द्यावी तसं हाय हे. यातही समाधान हे की जे बिचारे हातावर पोट असनारे असत्यात ते स्पॉटबॉयपासून मेकअपमन हेअरड्रेसरपर्यन्त त्यांचं पोट सुरू र्हानार. बाकी माजोरडे कलाकार कर्मानं मरनार. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत हुनार. जिथं फुलं वेचली तिथं गवर्या वेचायची वेळ येनार. असो. माझ्यावर कटकारस्थान रचून फायदा कुनाचा झाला आनि नुकसान कुनाचं झालं यावर एक चिंतन शिबीर घ्यावं त्यांनी. बाकी वाढदिवस लैच भारी गेला. तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावानं भारावून गेलो. या वर्षीचा वाढदिवस ‘स्पेशल’ बनवला तुमी. एकेक पोस्ट वाचताना आनंदाश्रू येत होते. लब्यू लब्यू लब्यू लैच मित्रमैतरनींनो. तुमाला अभिमान वाटंल आसंच काम माझ्या हातनं होत र्हाईल याची खात्री देतो. मनापास्नं आभार,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली.
Discussion about this post