हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण महाराष्ट्राचं आद्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांच्या नुसत्या नावानेही मराठी माणसाच्या अंगात उत्साह संचारतो. शिवरायांची कीर्ती तरुणांना स्फूर्ती देते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय..? हे उघडायला अख्खा जन्म द्यावा लागतो असे हे महान व्यक्तिमत्व आहे. महाराज होते म्हणून आज आपण आहोत आणि त्यामुळे आजही ते मनामनांत पुजले जातात. यामुळे जेव्हा ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत महाराजांचा उल्लेख झाला तेव्हा सगळ्यांचे कान टवकारले आणि त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ नुसता चर्चेचा विषय ठरला.
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत नुकतीच अपर्णाची म्हणजेच अप्पीची कलेक्टर होण्यासाठीची मुलाखत पार पडली. या विशेष भागासाठी ज्येष्ठ वकील उज्वल निकम आणि लेखक विश्वास पाटील यांनी मालिकेत सहभाग घेतला होता. दरम्यान अप्पीच्या मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या महिला मुलाखतकार यांनी तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऊंची संदर्भात एक प्रश्न विचारला. यावर अप्पीने दिलेल्या उत्तराने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती..?’ असा हा प्रश्न असतो.
ज्यावर उत्तर देताना अप्पी सांगते कि, ‘तसं तर अनेक इतिहासकारांनी प्रत्येक पुस्तकात वेगवेगळी नोंद केली आहे. वेगवेगळे संदर्भ आहेत. त्यांची उंची अंदाजे पाच फूट पाच इंच ते पाच फूट आठ इंच एवढी असेल’. यावर मुलाखतकार तिच्याकडे ठाम उत्तर मागतात. तर अप्पी म्हणते, ‘मॅडम चार हजार सहाशे चार फूट उंच असलेला तोरणा किल्ला महाराजांनी काबीज केला. साडे तीनशे वर्षांची गुलामी तोडून स्वराज्याचं तोरण बांधलं. आता या माणसाची उंची आपण कशी काय मोजायची, नाही का..’. अप्पीने दिलेल्या उत्तराने प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून आला आहे. तीच हे उत्तर दाखवणारा मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
Discussion about this post