हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत भारतीय इतिहासाचे आणखी एक सुवर्ण पान उघडले जाणार आहे ते ”मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटातून. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार आहे. तत्पूर्वी आज विजयादशमीच्या निमित्ताने पारंपरिक शिवकालीन शस्त्रांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक राहुल जाधव उपस्थित होते. त्यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तर लेखक, तथा मुख्य सहाय्यक दिग्दर्शक डॉ. सुधीर निकम यांनी मराठा कालीन शस्त्रे आणि त्यांची कार्यें यांची माहिती दिली..
या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या भोर येथे सुरू आहे. ‘खंडेनवमी’चं औचित्य साधून चित्रीकरणस्थळी पारंपरिक शिवकालीन शस्त्रांचे पूजन करण्यात आले. या वेळी गुर्ज, खंडा तलवार, मराठी वक्रधोप, सरळ धोप, सर्पिन तलवार, मराठा कट्यार, मराठा बिचवा, खंजीर, वाघनखें, चिलखत, जिरे टोप, विटा, हलदाई, चंद्रकार, दांडपट्टा, गोफनगुंडा, अशा अनेक शिवकालीन पारंपरिक शस्त्रांचे पूजन ताराराणी हि भूमिका साकारणाऱ्या सोनाली कुलकर्णीच्या हस्ते करण्यात आले. दसऱ्याच्या निमित्ताने हे पूजन केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
‘प्लॅनेच मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’सर्व रसिकप्रेक्षकांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. दसऱ्याच्या दिनी शस्त्रांची पूजा केली जाते. शस्त्राने देशाच्या सीमेची रक्षा करणारे, कायद्याचे रक्षण करणारे किंवा शस्त्राचा इतर चांगल्या कामासाठी वापर करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ताराराणीने याच शस्त्रांच्या साहाय्याने आपले साम्राज्य वाचवले. त्यांना मानवंदना देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.’’ हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या “मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई” या ग्रंथावर आधारीत असून, “मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी” या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत. या चित्रपटाची निर्मिती प्लॅनेट मराठी आणि मंत्रा व्हिजनने केली आहे.
Discussion about this post