हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना नामक विषाणूने नुसता हाहाकार माजवला आहे. दरम्यान कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकांनि आपले प्राणही गमावल्याचे दिसत आहे. अश्या या भयावह परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंधांसह संपूर्ण राज्यात लोकडाऊन लावला आहे. परिणामी नियमावलीनुसार सध्या चित्रीकरण आणि नाटय़गृहे सार काही बंद आहे. यामुळे नाटय़ व्यवसायावर अवलंबून असणाऱया अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यात कोरोना संसर्ग झालेल्या मुंबई आणि परिसरातल्या रंगकर्मींना आधार देण्यासाठी ‘ थिएटर दोस्त’ आता पुढे सरसावला आहे. ह्या थिएटर दोस्तने गरजू रंगकर्मींना औषधे, जेवणाचे डबे आणि काउन्सिलिंग अशा सुविधा पुरविण्याचे काम सुरू केले आहे .
सुनील शानभाग, सपन सरन, अक्षय शिंपी, मंजिरी पुपाला, प्रियांका सरन, कल्याणी मुळे आणि सौम्या त्रिपाठी असे काही रंगधर्मी एकत्र येऊन त्यांनी ‘थिएटर दोस्त’ ही एक संकल्पना राबवली आहे. एकत्र राहू तर सशक्त राहू अशी थिएटर दोस्तची टॅगलाईन आहे. जवळपास एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून या ग्रुपने काम सुरू केले. सोशल मीडियावर यासंदर्भातील मोबाईल नंबर शेअर करण्यात आले आहेत. या उपक्रमाला अगदी अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
‘थिएटर दोस्त’च्या अंतर्गत टेली-डॉक्टर, वैद्यकीय चाचण्या, डॉक्टरांची फी, औषधे, घरगुती वाण सामान, जेवणाचे डबे यांसाठी आर्थिक साह्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. थिएटर दोस्तसाठी लागणारा निधीही रंगकर्मींनी स्वतः उभा केला आहे. मुंबई आणि परिसरातल्या अनेक नाटय़कर्मींनी थिएटर दोस्तसाठी निधी जमवून दिला आहे. त्यातूनच हे कार्य केले जात आहे.
आमचा ग्रुप सध्यातरी आहे. सध्या आम्ही माहिती जमा करीत आपले काम करीत आहोत. मुंबई आणि परिसरातल्या डॉक्टरांच्या, वॉर्ड ऑफिसरच्या याद्या, ज्यांना गरज आहे, असे रंगकर्मी आणि त्यांच्यापर्यंत औषधे-डबे पोहोचवू शकतील, अशा स्वयंसेवकांची माहिती जमवत आहोत. केवळ मराठी रंगभूमीच नव्हे तर हिंदी, गुजराती अशा विविध भाषिक मुंबईतील रंगकर्मी, रंगमंच कामगार यांच्यासाठी ‘थिएटर दोस्त’ काम करत आहे, अशी माहिती अभिनेत्री कल्याणी मुळे यांनी दिली.
एखाद्या रंगकर्मीला कोरोना झाला तर त्याला लागणारी औषधे पुरवणे, औषधांसाठी निधी नसेल तर तो देणे, जेवणाचा डबा त्या भागात जिथे मिळत असेल तिथून उपलब्ध करून देणे, औषधांची, डॉक्टरांची, काउन्सिलर्सची यादी करणे, कोविड रुग्णाला टेली डॉक्टर्स देणे यावर या मंडळींचा विशेष भर आहे.
Discussion about this post