हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे पंढरीची वारी. वर्षातून एकदा येणारी हि वारी चैतन्यवारी आणि आनंद सोहळा म्हणून ओळखली जाते. दरवर्षी वारीच्या निमित्ताने लाखो, करोडो भाविक आपल्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पायी प्रवास करीत विठ्ठल नगरीत दाखल होत असतात. हा असा चिंतन सोहळा आहे जो आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवायलाच हवा असे प्रत्येकजण म्हणतो.
या सोहळ्यात प्रत्येकजण विठुरायाच्या ओढीने सामील झालेला असतो. इथे कोणत्याही रोगराई आणि संसर्गाची कुणालाच भीती वाटत नाही. कारण इथे विठुरायाच्या भक्तीचाच केवळ संसर्ग असतो. अशा या भक्तिमय वातावरणात सामील व्हायला कुणाला आवडणार नाही. तर यंदाच्या वारीत अनेक कलाकार देखील सहभागी झाले होते. त्यांनी आपापले अनुभव देखील सांगितले आहेत.
या वारीने वारकऱ्यांसह अनेक कलाकारांनादेखील हरी रंगात माखवलं आणि टाळ चिपळ्यांच्या तालावर नाचवलंच आहे. हे कलाकार वारीत रमले, नाचले, वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली आणि विठूनामाच्या गजरात नाहून गेले. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, दीपाली सय्यद, संदीप पाठक, स्पृहा जोशी, अश्विनी महांगडे, स्वप्निल जोशी आणि असे अनेक कलाकार या वारीत सहभागी झाले होते.
स्वराज्यरक्षक संभाजी आणि आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अश्विनी महांगडेने यंदा वारीचा अनुभव घेतला. तिने भावना ब्यक्त करत म्हटले कि, ‘शब्दात मांडता न येणारा असा या वर्षीचा वारीचा अनुभव आहे. आत्मिक समाधान म्हणजे वारी. वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारी भक्ती म्हणजे वारी’
तर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यदही यंदा वारीत सामील झाल्या. त्यांनी विठुरायाकडे एकच मागणे केले ते म्हणजे, महाराष्ट्रावर आलेले संकटं दूर होऊन चांगले दिवस येऊ दे.
याशिवाय अभिनेता संदीप पाठक वारीत विठूगजरात दंग झाला होता. खरंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तो वारी करतोय पण एखाद्या वारकऱ्याप्रमाणे तो वारीत रंगला आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडदेखील वारीत सामील झाली होती. तिने तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर केला. शिवाय टाळ मृदुंगाच्या गजरात तिने पारंपरीक भजनांवर ठेकाही धरला.
यानंतर पुढे पुण्यात माऊलींची पालखी दाखल होताच स्पृहा जोशीदेखील वारीत सहभागी झाली. वैष्णवांचा मेळा हरीभक्तीत तल्लीन झालेला पहिल्यांदाचा पाहिला असा अनुभव स्पृहाने सांगितला.
शिवाय अभिनेता स्वप्नील जोशी यानेही वाखारी ते पंढरपूर पायी वारी केली. या अनुभवाबाबत सांगताना स्वप्नील म्हणाला कि, ‘काल वाखरी ते पंढरपूर पाई वारी चाललो. अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली. कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे. बघू, पांडुरंग कधी संधी देतो.’ याशिवाय या कलाकारांनी संपूर्ण वारीत आपल्या आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा देखील केला.
शेवटी सारी त्याचीच लेकरं.. त्यामुळे त्याच्या नाम गजरात दंग होणारच..! बोला.. पुंडलिक वरदे हारी विठ्ठल! श्री ज्ञानदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराज कि… जय!
Discussion about this post